पोलीस चौकशीतून धक्कादायक माहिती उघड : अभिनेत्रींची आणखी कोंडी होण्याची शक्यता
प्रतिनिधी / बेंगळूर
ड्रग्ज प्रकरणी कारागृहात असलेल्या कन्नड अभिनेत्री रागिणी द्विवेदी आणि संजना गल्रानी सहभागी होत असलेल्या पाटर्य़ांशी भूमिगत गुंडांचे कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती पोलीस चौकशीतून पुढे आली आहे.
बेंगळूर शहर आणि उपनगरातील रिसॉर्टमध्ये रात्री-अपरात्री आयोजित होणाऱया पाटर्य़ांमध्ये राजकारणी, उद्योजकांची मुले, अभिनेते-अभिनेत्री यांच्याबरोबरच भूमिगत गुंड देखील सहभागी होत होते. यावेळी ड्रग्ज आणि पैसा देखील पुरविण्यात येत होता. गुंड इफ्तियाज पैलवान, मसूर उर्फ मस्सी यांच्यासह अनेकजण पाटर्य़ांमध्ये सहभागी होत होते, अशी माहिती सीसीबी पोलिसांच्या हाती लागली आहे.
नाईट क्लब, पब, आलिशान हॉटेलमध्ये पाटर्य़ांना अभिनेत्री रागिणी आणि संजना उपस्थित राहणार असल्याचे सांगून प्रमुख आरोपी विरेन खन्ना अनेकांना आकर्षित करून घेत होता. पार्टी संपल्यानंतर आफ्टर पार्टी आयोजित केली जात होती. यामध्ये अनेक अनैतिक प्रकार घडत होते, अशी माहिती सीसीबी पोलिसांना मिळाली आहे.
गलेलठ्ठ पगार घेणारे सॉफ्टवेअर कंपन्यांमधील अभियंते, उद्योजकांची मुले आणि रियल इस्टेटमधील उद्योजकांना ड्रग्ज पाटर्य़ांसाठी गळ घातली जात होती. ड्रग्ज प्रकरणातील अभिनेत्रींना चित्रपटातील अभिनयापेक्षा अधिक पैसा या पाटर्य़ांमधून मिळत होता, अशी धक्कादायक माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे या अभिनेत्रींची आणखी कोंडी होणार आहे.
आदित्य अल्वा अद्याप फरार…
ड्रग्ज प्रकरणात आरोप असणारा आदित्य अल्वा अद्याप सीसीबी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो दिवंगत माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा पुत्र आहे. ‘पेज थ्री’ पाटर्य़ांचे आयोजन करणारा विरेन खन्ना याच्याशी आदित्यचा संपर्क असल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे. तो रियल इस्टेट उद्योजक आहे. ड्रग्ज प्रकरणी कारवाई सुरू झाल्यानंतर तो फरार झाला आहे. तो विदेशात पळून जाऊ नये यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक प्रयत्नशील आहे.









