भाजपच्या बिथाकीत महत्वपूर्ण निर्णय
गांधीनगर/प्रतिनिधी
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. दरम्यान, आज नवीन मुख्यमंत्री निवडीसंदर्भात पक्षाची बैठक झाली. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्ह्णून शिक्कामोर्तब झाले आहे. भूपेंद्र पटेल हे पाटीदार समाजातील आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शाह यांनी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री म्हणून संधी दिली आहे.
आज गुजरात भाजपाच्या दीर्घकाळ चाललेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र रजनीकांत पटेल यांची मुख्यमंत्रीपदी एकमताने निवड करण्यात आली. भूपेंद्र पटेल हे घाटलोदिया मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.
भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने पाटीदार समाजाकडे गुजरातचं मुख्यमंत्रीपद गेलं आहे. त्यासोबतच गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे देखील मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते. मात्र, त्यांना डावलून भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. याआधी देखील ऑगस्ट २०१६ मध्ये आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, तेव्हा नितीन पटेल त्यांची जागा घेतील, अशी चर्चा होती. मात्र तेव्हा देखील त्यांच्याऐवजी रुपाणी यांची निवड करण्यात आली होती.