चार हजाराहून अधिक भाविकांचा सहभाग, आज यात्रोत्सवाचा मुख्य दिवस : उद्या कुस्त्या
वार्ताहर /नंदगड
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱया हलशी येथील श्री भुवराह-नृसिंहदेव यात्रेला रविवार दि. 9 रोजी रथोत्सवांनी सुरुवात झाली. यावेळी चार हजाराहून अधिक भाविकांचा सहभाग होता. सोमवारी 10 रोजी मुख्य यात्रोत्सव व मंगळवार दि. 11 रोजी खळय़ाच्या कुस्त्या होणार आहेत.
रविवारी पहाटेपासूनच विधिवत देवाची पूजा-अर्चा व होमहवन झाले. दुपारी रथाची पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांकरवी रथोत्सव साजरा करण्यात आला. सजविलेल्या रथासोबत पालखी उत्सवही साजरा झाला. दुपारी 2 वाजता मंदिरापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत रथ ओढण्यात आला. रात्री पुन्हा गावातील प्रमुख मार्गावरून परंपरेनुसार रथ ओढण्यात आला.
यावेळी नंदगड, खानापूर, बिडी, बेकवाड, हलगा परिसरातील भाविक सहभागी झाले होते. रविवारी वाल्मिकी जयंतीनिमित्त सुटी असल्याने शासकीय कर्मचाऱयांसह कामगार व शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
यात्रेनिमित्त हलशी गावातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा विविध स्टॉल लावण्यात आले आहेत. श्री नृसिंह-वराह देवाच्या दर्शनाबरोबरच येथील दगडी मंदिरावरील कलाकुसर शिलालेख न्याहाळण्याचा आनंद अनेकांनी घेतला.
अनेक मंदिरांना भाविकांच्या भेटी
शिवाय हलशी गावातील हट्टीकेश्वर मंदिर, जैन मदिर, कलमेश्वर, सुवर्णेश्वर कपिलेश्वर, जमकेश्वर, बसवेश्वर, गोकर्णेश्वर, हनुमान व गणेश मंदिरासह सोमतीर्थ, वराहतीर्थ, चक्रतीर्थ या ठिकाणी भाविकांनी भेटी दिल्या.









