वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला आहे. मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकांत त्याने चमकदार प्रदर्शन केले होते. महिलांमध्ये हा बहुमान दक्षिण आफ्रिकेच्या लिझेली ली हिला मिळाला.
भुवनेश्वरने तीन वनडेत 4.65 च्या इकॉनॉमी रेटने 6 बळी मिळविले तर पाच टी-20 सामन्यात 6.38 च्या इकॉनॉमीने 4 बळी टिपत उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. या बहुमानासाठी निवड झाल्यानंतर भुवनेश्वरने आयसीसी, चाहते, सहकाऱयांचे आभार मानले. या बहुमानासाठी अफगाणचा लेगस्पिनर रशिद खान व झिम्बाब्वेचा सीन विल्यम्स यांनाही नामांकन मिळाले होते.
महिलांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या लिझेली ली हिला महिन्यातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा बहुमान मिळाला. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत तिने एक शतक व दोन अर्धशतके नोंदवत महिलांच्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावले हेते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तिनेही आनंद व्यक्त करीत आयसीसी, चाहते व सहकाऱयांचे आभार मानले. या पुरस्कारासाठी भारताच्या राजेश्वरी गायकवाड व पूनम राऊत यांनाही नामांकन मिळाले होते. आयसीसी व्होटिंग ऍकॅडमीतर्फे या पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड केली जाते. या ऍकॅडमीत क्रिकेटमधील जाणकार व्यक्ती, वरिष्ठ पत्रकार, माजी खेळाडू, प्रक्षेपक व हॉल ऑफ फेममधील काही सदस्यांचा समावेश आहे.









