वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी उभारणी
प्रतिनिधी / बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानक व सीबीटी बसस्थानक यांना जोडण्यासाठी बसस्थानकाच्या मुख्यमार्गावर भुयारी मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. गतवषी कोरोनामुळे भुयारी मार्गाचे काम अर्धवट स्थितीत राहिले होते. या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. बसस्थानक परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून या भुयारी मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. मात्र अद्यापही निम्मे काम शिल्लक आहे.
मध्यवर्ती स्मार्ट बसस्थानकाचा तब्बल 31 कोटींच्या निधीतून विकास साधण्यात येत आहे. याबरोबरच भुयारी मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. मात्र कोरोनामुळे या कामाला विलंब झाला आहे. मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेल्या या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित दोन्ही बसस्थानकांना जोडण्याचे काम अद्याप शिल्लक आहे. त्या कामाला सुरुवात झाली आहे. भुयारी मार्गावरून वाहतूक सुरू असली तरी अद्याप या मार्गाचे काम शिल्लक आहे. उपमुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मध्यवर्ती बसस्थानकाची पाहणी करून तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या होत्या. मात्र अद्यापही स्मार्ट बसस्थानक व भुयारी मार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याचे पहायला मिळत आहेत. गतवर्षी कोरोनामुळे परप्रांतीय कामगार मूळ गावी परतल्याने कामाला स्थगिती मिळाली होती. दरम्यान अनलॉकनंतर सुरू झालेले कामदेखील धिम्यागतीने होत असल्याने विकासकामे रखडली आहेत.









