नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पुन्हा तहकूब
प्रतिनिधी / इस्लामपूर
इस्लामपूर नगरपालिकेतील राजकारण निवडणुकीच्या तोंडावर चांगलेच तापले आहे. विशेष सभा तहकूबीचा खेळ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे रंगला असतानाच सोमवारच्या सर्वसाधारण सभेत दोन्ही गटाच्या नगरसेवकांत चांगलीच जुंपली. पूर्वीच्या बोगस टेंडर प्रक्रियेवरून विकास आघाडी नगरसेवकांनी राष्ट्रवादीला टार्गेट केले. तर भुयारी गटार योजनेचे काम सुरु झाल्याशिवाय यापुढील कुठलीच सभा होणार नसल्याचा निर्णय विकास आघाडीने घोषित केला. पाठीमागील विषयांवरच चर्चेचे गुर्हाळ होवून सोमवारची ही सभा मुदत न देता तहकूब करण्यात आली.
दि. २२ मार्च २०२१ रोजी तहकूब झालेल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन सोमवारी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी वैभव साबळे यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्याधिकारी साबळे म्हणाले, तांत्रिक बाबींची माहिती घेवून प्रशासनाला कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेवून भुयारी गटार योजने काम सुरु करण्यात येईल. गेल्या चार दिवसांपासून रस्ते विकास निधी वितरणाच्या विशेष सभा तहकूबीचा खेळ रंगल्याच्या पार्श्वभूमीवर ही सभा झाली. सभेच्या सुरुवातीपासूनच दोन्ही गटाचे नगरसेवक परस्परांवर तुटून पडले. या सभेत नवे विषय चर्चेला येण्यापूर्वीच राष्ट्रवादी सत्ताकाळातील कारभारावरून विकास आघाडी नगरसेवकांनी शिळया कढीला ऊत आणला.