अपेक्षित महसुलापासून अद्याप दूरच : वन्यप्राण्यांचा दैनंदिन खर्च अधिक, कोरोना नियमांचे पालन करूनच प्रवेश
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाकडे पाठ फिरविलेल्या पर्यटकांचा आता ओघ वाढत आहे. त्यामुळे दैनंदिन महसुलात वाढ झाली असून संग्रहालय व्यवस्थापनाला दिलासा मिळाला आहे. अनलॉकच्या शिथिलतेनंतर मे महिन्यापासून प्राणी संग्रहालयाचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते. मात्र कोरोनाची भीती, अति पाऊस यामुळे पर्यटकांनी संग्रहालयाकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे महसूलही पूर्णपणे थांबला होता. त्यामुळे संग्रहालय अडचणीत आले होते. मात्र, आता मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने संग्रहालयाकडे पर्यटकांची पावले वळताना दिसत आहेत.
म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर विकसित करण्यात येत असलेल्या भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात तीन सिंह, दोन वाघ, दोन बिबटे आणि दोन कोल्हे दाखल झाले आहेत. शिवाय हरीण, मगर व काही पक्षीही ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींसह लहान मुलांमध्ये वन्यप्राण्यांना पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच स्थानिक नागरिकांसह इतर ठिकाणांहून येणाऱया पर्यटकांची संख्या वाढली आहे.
प्राणी दत्तक योजना
मार्च-एप्रिलदरम्यान कोरोनाने दुसऱयांदा धुमाकूळ घातल्याने प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे महसूल थांबला होता. दरम्यान, संग्रहालयातील वन्यप्राण्यांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे प्राणी दत्तक योजना राबविण्यात आली होती. या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. अनेकांनी काही काळासाठी वन्यप्राण्यांना दत्तक घेतले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या देखभालीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
प्राणी संग्रहालयात दहा प्राणी
प्राणी संग्रहालयात सिंह, वाघ, बिबटे, कोल्हे असे दहा प्राणी आहेत. त्यांना दररोज 50 ते 60 किलो मांस लागते. त्यामुळे त्यांचा दैनंदिन खर्च अधिक आहे. हा देखभालीचा खर्च पर्यटकांच्या माध्यमातून भागविला जातो. मात्र, मागील काही दिवसांत पर्यटकांनी पाठ फिरविल्याने संग्रहालय अडचणीत सापडले होते. आता पर्यटकांची संख्या वाढत असल्याने उत्पन्नात वाढ झाली आहे. पर्यटकांच्या माध्यमातून संग्रहालयाला आता दैनंदिन 20 ते 25 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
निसर्गधामाचे मिनी प्राणी संग्रहालयात रुपांतर
म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयाच्या पार्श्वभूमीवर भुतरामहट्टी येथील निसर्गधामाचे मिनी प्राणी संग्रहालयात रुपांतर करण्यात येत आहे. या संग्रहालयात वन्यप्राण्यांसाठी नियोजनबद्ध बांधणी करण्यात येत असून निवारा शेडची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे दाखल झालेल्या वन्यप्राण्यांची स्वतंत्र शेडमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत संग्रहालयात सिंह, वाघ, बिबटे व कोल्हे दाखल झाले असले तरी कोरोनामुळे चित्ता, अस्वल, गवीरेडे, हरीण व इतर वन्यप्राण्यांची एन्ट्री लांबणीवर पडली आहे.
प्राणी संग्रहालय रोज सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत खुले
पावसाने उघडीप दिल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे. सध्या प्राणी संग्रहालय शनिवार-रविवार विकेंड कर्फ्यूचे दोन दिवस वगळता दररोज सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येत आहे. प्रौढ व्यक्तींसाठी 40 रुपये तर 5 वर्षांखालील बालकांसाठी 20 रुपये शुल्क आकारणी करण्यात येत आहे. पर्यटकांना मास्क व इतर कोरोना नियमांचे पालन करूनच प्रवेश दिला जात आहे.
निर्बंधांमुळे महसुलावर परिणाम : राकेश अर्जुनवाड ( आरएफओ, भुतरामहट्टी)
कोरोना काळात पर्यटकांवर निर्बंध आल्याने महसुलावर परिणाम झाला होता. त्यानंतर संग्रहालय खुले करण्यात आले होते. मात्र, पर्यटकांचा प्रतिसाद मिळाला नाही. मागील काही दिवसांपासून प्राणी संग्रहालय असल्याने महसूलही वाढत आहे.









