काम अंतिम टप्प्यात : लवकरच टायगर सफारीला प्रारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
पर्यटकांना टायगर सफारीचा आनंद लुटता यावा, याकरिता भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात टायगर सफारीचे काम हाती घेण्यात आले आहे. नरेगा योजनेंतर्गत सुरू असलेल्या या कामाला गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे लवकरच टायगर सफारीच्या मार्गावर वाघांची गगनभेदी डरकाळी घुमणार आहे.
शहरापासून जवळ असलेल्या भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात सिंह, वाघ, बिबटे, कोल्हे, सांबर, काळवीट, अस्वल, तरस यासह इतर प्राणी आणि पक्षी दाखल झाले आहेत. त्यामुळे संग्रहालयात वन्यप्रेमी व पर्यटकांचा ओघ वाढला आहे. दरम्यान शनिवार व रविवारी व सुटीदिवशी पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटकांना अगदी जवळून वाघांचे दर्शन व्हावे, याकरिता टायगर सफारी मार्गाचा विकास साधला जात आहे. या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून टायगर सफारीला प्रारंभ होणार आहे.
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या परवानगीनंतर म्हैसूर येथून गतवर्षी दोन नर जातीचे वाघ दाखल झाले आहेत. दरम्यान, त्याची स्वतंत्र होल्डींग रुममध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना, लॉकडाऊन व शासनाच्या अनुदानाअभावी टायगर सफारीचे काम रखडले होते. दरम्यान, जिल्हा पंचायतीच्या नरेगाअंतर्गत सफारी मार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. त्यामुळे लवकरच जंगलातील निर्धास्त चाल आणि काळजाचा थरकाप उडविणारी डरकाळी ऐकायला मिळणार आहे.
टायगर सफारीच्या मार्गावर विशेष संरक्षक जाळीसह लॉक कंट्रोल सिस्टिम असलेले वाहन सेवा देणार आहे. साधारण 1.2 किलो मीटर अंतरावर सफारी होणार आहे. शिवाय वॉकिंग ट्रकची व्यवस्था केली आहे. त्यामुळे लवकरच बेळगावकरांचे टायगर सफारीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
वॉकिंग टॅक, पायी चालण्यासाठी मार्ग उपलब्ध
अनुदानाअभावी टायगर सफारीचे काम रेंगाळले होते. मात्र नरेगा अंतर्गत कामाला प्रारंभ झाल्याने काम जलद गतीने सुरू आहे. सफारी मार्गाचे काम पूर्ण होताच टायगर सफारीला सुरुवात केली जाणार आहे. टागगर सफारीबरोबर वॉकिंग टॅक, पायी चालण्यासाठी मार्ग उपलब्ध केला जाणार आहे.
– जी. पी. हर्षाबानू (उपवनसंरक्षणाधिकारी, बेळगाव)









