दयानंद जाधव / पाचगाव
शहरातील वंचित एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी कोल्हापुरातील दोन युवकांनी ओपन फ्रिज ही नाविन्यपूर्ण संकल्पना सोमवारपासून राजारामपुरी येथे राबवलेली आहे.
राजारामपुरी येथील राजवीर बिर्याणी हॉटेलचे मालक सतीश पोवार व त्यांचे मित्र रामेश्वर पतकी हे दोन युवक परिस्थितीमुळे उपाशी राहणाऱ्या लोकांना बघून नेहमी अस्वस्थ होत होते. आपण पोटभर जेवत असताना आपल्या शहरातील काही वंचित नागरिक, फिरस्ते, भिकारी यांना एक वेळचे जेवण देखील मिळत नाही. बऱ्याच वेळा हे नागरिक उपाशी झोपतात याची जाणीव झाल्यापासून हे दोन युवक अस्वस्थ झाले होते. या सामाजिक जाणिवेच्या अस्वस्थ तेमधूनच या युवकांना नाविन्यपूर्ण ओपन फ्रीज ही संकल्पना सुचली.
या संकल्पनेनुसार राजारामपुरी चौथी गल्ली येथील राजवीर बिर्याणी सेंटरजवळ एक चालू स्थितीतील आणि एक बंद स्थितीतील दोन फ्रीज ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या घरातील चांगल्या स्थिती मधील चपाती, भाजी, भात यासारखे पदार्थ स्वतः येथे येऊन चालू फ्रिजमध्ये ठेवायचे आहेत. तर कोरडे पदार्थ बिस्किट, ब्रेड, चिवडा, फरसाण, भडंग इत्यादी कोरडे पदार्थ बंद फ्रिजमध्ये ठेवायचे आहेत. जे भुकेलेले असतील ते स्वतः या ठिकाणी येऊन त्यांना जे हवे ते या दोन फ्रिजमधील अन्नपदार्थ घेऊन खाऊ शकतात. यामुळे नागरिकांच्या घरातील जादाचे अन्न वाया जाणार नाही. अन्नाची होणारी नासाडी टळेल आणि ज्यांना खरंच अन्नाची गरज आहे. त्यांना हे अन्न मिळेल असा हा उपक्रम या दोन युवकांनी राबवला आहे.
या फ्रीजमध्येच राजवीर बिर्याणी मार्फत सुरुवातीला पाण्याचीही नागरिकांसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. कोल्हापुरातील एकही वंचित नागरिक, भिकारी, फिरस्ते रात्री उपाशी झोपू नयेत यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्नशील असल्याचे सतीश पोवार आणि रामेश्वर पतकी या दोन युवकांनी सांगितले.
ओपन फ्रिज या उपक्रमाचे उद्घाटन प्रा जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक सिताराम डुबल, सुभाष मुदंडा, अतुल पोवार ,प्रदीप पोवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.









