गांधी रोड – राय येथील दुर्दैवी घटना : बालिका घरी आजीजवळ असल्याने बचावली
प्रतिनिधी /मडगाव
मायणा गावाजवळील गांधी रोड – राय येथे रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सुसाट वेगाने आलेल्या कारची धडक बसल्याने एक युवा जोडपे जागीच ठार झाले. या जोडप्याबरोबर त्यांची एकुलती एक मुलगी अपघातावेळी नव्हती. अन्यथा संपूर्ण कुटूंबच अपघातात गेले असते. ही 10 वर्षाची मुलगी घरी आजीबरोबर असल्यामुळे वाचली.
अपघातातील मयत युवकाचे नाव कॅनेडी डिकॉश्ता (35) असे असून त्याच्या पत्नीचे नाव नोव्हेला डिकॉश्ता (28) असे आहे. दोघेही जागीच ठार झाले. कुडतरी येथील नेथानियोल मिनेझिस या 24 वर्षीय संशयित आरोपीला मायणा कुडतरी पोलिसांनी अटक केली आहे. अपघातात जी दुचाकी सापडली त्या दुचाकीचे दोन तुकडे झालेले दिसत होते.
कारने अगोदर बसला, नंतर दुचाकीला ठोकरले
प्राप्त माहितीनुसार अपघातातील संशयित आरोपी हा मडगावहून कुडतरीच्या दिशेने जात होता तर मयत आपल्या दुचाकीवरुन कुडतरीच्या दिशेहून मडगावच्या दिशेने जात होता. गांधी रोड येथे एक बस रस्त्याच्या बाजुला पार्क केलेली होती. या बसला संशयित आरोपीच्या कारची धडक बसली आणि नंतर समोरुन येत असलेल्या दुचाकीला जबरदस्त धडक बसली, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
अपघातस्थळी भीषण, भयावह परिस्थिता
ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीच्या मागे बसलेली दुचाकीस्वाराची पत्नी रस्त्याच्या बाजुला असलेल्या एका घराच्या कंपाउंडमध्ये उडून पडली तर दुचाकीस्वाराला कारने सुमारे 300 मीटर फरफटत नेले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघाताची वास्तवता अत्यंत निर्दयी होती. अपघाताचे स्वरुप पाहता कार चालक अतिवेगाने वाहन चालवत होता, असे दिसत होते. या अपघातानंतर बराच मोठा आवाज झाला. रात्र असूनही अनेक शेजारी अपघाताच्या ठिकाणी धावत एकत्र आले. घराबाहेर आलेल्या या स्थानिकांना अपघाताचे स्वरुप पाहताच अपघाताच्या भयानकतेची कल्पना आली.
अपघातानंतर कारचालक पळाला
अपघातानंतर आरोपी तेथून पळाला. अपघाताची खबर ऐकून ऍम्बुलन्स घटनास्थळी आली. पोलीस आले. मात्र, जोपर्यंत या प्रकरणातील संशयित आरोपीला अपघाताच्या ठिकाणी आणत नाहीत तोपर्यंत दोन्ही मृतदेह नेऊ देणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला. असा अपघात आम्ही कधीही पाहिला नाही. इतका हा अपघात मोठा होता, अशी माहिती एका स्थानिकाने दिली.
संतप्त ग्रामस्थांकडून कारचालकास आणण्याची मागणी
या प्रकरणातील संशयित आरोपी अमलीपदाथांचे सेवन करतो, असा आरोप माध्यमासमोर त्याला ओळखणाऱया स्थानिकांनी केला आणि त्याला अपघाताच्या ठिकाणी आणून सर्व लोकांसमोर त्याची चाचणी करावी आणि जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत आम्ही दोन्ही मृतदेह हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतली.
अपघात झाला आणि अपघातातील व्यक्ती मृत झाली की ती गंभीररित्या जखमी झालेली किंवा मृत व्यक्ती तेथेच पडते. मात्र, या अपघातातील मयत व्यक्ती दूर उडाली. यावरुन अपघाताच्या स्वरुपाची कल्पना करता येते असे एका स्थानिकाने सांगितले.
दुसऱया एका स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर आपण दुचाकीचे विखुरलेले भाग आणण्यासाठी इकडे तिकडे पाहात असताना आपल्याला मयत नोव्हेला डिकॉश्ता हिचा मृतदेह जवळच्या घराच्या कंपाउंडमध्ये सापडला. त्यावेळी ती जर आपल्याला दिसली नसती तर थेट दुसऱया दिवशी सकाळी तिचा मृतदेह आढळला असता अशी माहिती दुसऱया एका स्थानिकाने दिली.
मन हेलावून जात होते…
मयत कॅनेडी डिकॉश्ता व नोव्हेला डिकॉश्ता यांना दहा वर्षाची एकुलती एक मुलगी आहे. कॅनेडी यांची वृद्ध आई घरी असते. त्यामुळे ही बालिका आपल्या आजीकडे त्यावेळी होती आणि म्हणून ती वाचली होती. अन्यथा आई वडिलांबरोबर तिही आज देवाघरी गेली असती. तिच्यावर आई वडिलांचे छत्र आता राहिले नाही. ती पोरखी झाली आहे. याची जाणीव होऊनच प्रत्येकजण त्यांच्या घरी जाऊन या बालिकेला धीर देत होते आणि त्या दृष्याने प्रत्येकाचे मन हेलावून जात होते.
पोलिसांनी आरोपीला पकडून कडक शिक्षा द्यावी : आलेक्स
घटनेची माहिती मिळताच राजीनामा दिलेले कुडतरीचे आमदार आलेक्स रिजीनाल्द लॉरेन्सो घटनास्थळी आले आणि त्यांनी पाहणी केली. हा अपघात भयानक आहे. या अपघातातील आरोपीला अटक करण्यात यावी अशी सूचना आपण पोलिसांना दिली असल्याचे लॉरेन्सो यांनी त्यावेळी स्थानिकांना सांगितले.
दारु पिऊन वाहन चालविणाऱयांवर पोलिसांनी अंकूश ठेवावा. अन्यथा त्यांच्यावर अंकूश ठेवणार तरी कोण असा सवाल करुन आज पोलिसांनी रात्रीच्यावेळी वाहन चालकांची तपासणी केली असती तर सुरावलीसारखा किंवा गांधीरोड मायणा सारखा दुर्दैवी अपघात झाला नसता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दारु पिणाऱयांनी जरुर प्यावी, मात्र वाहन चालकाने दारु घेऊ नये. दारु पिऊन वाहन चालविणाऱयावर पोलिसांनी कारवाई केली असती तर अशा प्रकारचा हा अपघात आपल्याला पाहायला मिळाला नसता असेही लॉरेन्सो यांनी सांगितले.
अठ्ठेचाळीस तासात सात जणांचा अपघाती मृत्यू : वाहन अपघातांच्या मालिकेने गोवा हादरला
गेल्या अवघ्या अठ्ठेचाळीस तासात सात जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चारही अपघात दक्षिण गोव्यातच झाले असल्याने वाहन अपघातांच्या मालिकाने दक्षिण गोवा हादरून गेला आहे. नशेच्या धुंदीत आणि बेशिस्तपणे वाहन चालविणे यामुळेच हे अपघात झाले असून त्यात सात निष्पाप युवा-युवतींचा बळी गेला आहे.
सुरावली कोलवा जंक्शनवर शनिवारी रात्री निवडणुकीच्या गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांना ठोकर देऊन चिरडण्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच मायणा कुडतरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत रविवारी रात्री गांधी मार्ग राय येथे एका हुंडाई क्रेटा वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कॅनेडी डिकॉस्ता (33) व त्यांची पत्नी नोव्हेला डिकॉस्ता (28) हे तरुण जोडपे ठार झाले. पोलिसांनी कारचालका विरोधात कारवाई केली आहे.
सुरावली कोलवा जंक्शनवर नाकाबंदीसाठी असलेल्या पोलीस शैलेश गावकर (30) व विश्वेश देईकर (32) यांना भरधाव येणाऱया एका स्कॉडा कारने धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. कारचालक मद्याच्या नशेत होता हे सिध्द झाले असून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. नंतर त्याची सशर्थ जामिनावर सुटका केली.
शनिवारीच काऱयामळ काले येथे एका ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने 19 वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात विद्या धाकलो वरक (19) हिचा मृत्यू झागीच झाला तर तिची बहिणही या अपघातात गंभीर जखमी झाली असून ती मडगाव येथील इस्पितळात उपचार घेत आहे.
एवढेच नव्हे, तर शनिवारीच रात्री रेल्वेची धडक बसून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाळ्ळी येथे रल्वे मार्गावर तर लोलये येथे रेल्वे मार्गावर मृतदेह सापडले आहेत. दोन्ही मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नसून मृतदेह गोमेकॉच्या शवागरात ठेवण्यात आले आहेत. अशाप्रकारे अठ्ठेचाळीस तासात सात जणांना अपघातांमध्ये आपले प्राण गमवावे लागले.









