तेराजण किरकोळ जखमी – वाहनांचे मोठे नुकसान
वाळपई – प्रतिनिधी
सत्तरी भिरोंडा याठिकाणी कदंब बस आणि टेम्पो ट्रव्हल यांच्यात शनिवारी सकाळी 7.30 च्या दरम्यान समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात एकूण 13 जण किरकोळ जखमी झाले. जखमींची प्रकृती ठिक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले. पैकी काहीजणांना वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले.
वाळपई येथून आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयांना घेऊन खासगी टेम्पो ट्रव्हल क्रमांक जीए-08-व्ही-5026 ही भिरोंडामार्गे पणजी याठिकाणी निघाली होती. तर कदंबा प्रवासी बस जीए-03-एक्स-0593 ही प्रवासी बस वांते येथून वाळपईच्या दिशेने चालली होती. भिरोंडा येथे कपेलजवळ रस्ता अरुंद असलेल्या ठिकाणी दोन्ही वाहने आली असता त्यांची समोरासमोर टक्कर बसली. या अपघातात टेम्पो ट्रव्हलरच्या दर्शनी भागाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
दोन्ही वाहनांची टक्कर होताच मोठा आवाज झाला. आवाज ऐकताच सभोवतालचे लोक मदतीसाठी घटनास्थळी धावले. काहींनी जखमी झालेल्यांना बसमधून बाहेर काढले. अपघात घडल्याची माहिती 108 रुग्णसेवेला दिल्यानंतर वाळपई रुग्णसेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना उपचारासाठी वाळपईच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.
अपघातात एकूण 13 जण किरकोळ जखमी झाले असून यात अंजनी हनुमंत राणे ( भिरोंडा), गणेश हनुमंत राणे (भिरोंडा), औदुंबर गजानन मांजरेकर (पिसूर्ले), संतोष लक्ष्मण मसुरकर (अन्साले), दिव्या दिगंबर नाईक (गवाणे), विठ्ठल दिगंबर नाईक (गवाणे), अश्विनी जयदेव गावकर (भिरोंडा), विजय दामोदर हरिजन (शिवाजीनगर खडकी), सर्वेश सहदेव हरिजन ( शिवाजीनगर खडकी), चंद्रावती रामचंद्र गावकर (धामसे वाळपई ), सगुण हरिश्चंद्र म्हाळसेकर (बाराजण खडकी), रणजीत बुधो हरिजन (खडकी वाळपई), सोमनाथ एकनाथ हरिजन (गवाणे)
अरुंद रस्ता धोकादायक
ज्याठिकाणी हा अपघात घडला सदर ठिकाणी रस्ता अरुंद आहे. येथे दोन वाहने सुटणे सहज शक्मय नाही. यामुळे दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. येथील रस्ता रुंद करण्याची मागणी नागरिकांनी यापूर्वी केलेली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. भिरोंडा- फोंडा दरम्यानची वाहतूक गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. यामुळे सदर अरूंद रस्ता रूंद करण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी अनेकवेळा दुचाकी वाहनांना या ठिकाणी अपघात झालेला आहे. वारंवार घडणाऱया अपघातांचा विचार करून सदर ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात यावा अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थंनी केली आहे.
पाडेली येथेही रस्ता रुंदीकरण गरजेचे
सरकारने कोटी रुपये खर्च करून पाडेली-धामसे पुलाची उभारणी केली. मात्र सदर ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आलेले नाही. यामुळे सदर भागातून
प्रवासी वाहने जाताना वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सरकारने पूल बांधला मात्र सदर ठिकाणी वाहने सोईस्कर घेऊन जाता येत नाहीत. यामुळे सदर पुलाचा फायदा काय असा सवाल वाहन चालक व प्रवासी करत आहेत. वाळपई- फोंडा मार्गावरील प्रवासी वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाने तसेच आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावा, अशी वाहनचालक व नागरिक मागणी करीत आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हरीश गावस, उपनिरीक्षक स्नेहा गावस यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. अपघाताचा पंचनामा करून पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.









