- ऍड. मंगेश ससाणे यांची मागणी
ऑनलाईन टीम / पुणे :
स्त्री शिक्षणाचा ज्या ठिकाणी पाया रचला गेला तो भिडे वाडा आजही दुर्लक्षित राहतो, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. जिथे स्त्री साक्षरतेची आद्यक्रांती झाली त्याच वास्तूची अवस्था दयनीय झाली आहे. पडक्या भिंती, मोडके खांब, जागोजागी पडलेले मातीचे ढिगारे, वाड्यात जाताही येणार नाही अशी बिकट वाट अशी वाड्याची दयनीय अवस्था झाली असतांना राज्य सरकाराने गेली कित्येक वर्षे हा प्रश्न केवळ खेळवत ठेवला आहे. राज्य सरकाने येत्या काही दिवसात भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित न केल्यास तीव्र आोदोंलन केले जाईल असा इशारा या मागणीसाठी सुरू असलेला न्यायालयीन लढा लढणारे वकील ऍड. मंगेश ससाणे यांनी दिला.
सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त आज युवा माळी संघ आणि ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी वेलफेअर फाैउंडेशन यांच्या सुंयुक्त विद्यमाने राज्य सरकार विरोधात भिडे वाडा येथे ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले, त्यावेळी ससाणे बोलत होते. यावेळी युवा माळी संघाच्या अध्यक्षा सुनीता भगत, वृषाली शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंगेश ससाणे म्हणाले की, सरकारला हा प्रश्न खरच सोडवायचा आहे की नाही अशी शंका यावी असे आजवर आलेल्या सर्वच राज्य सरकारांचे वर्तन दिसून येते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे हे कारण देऊन जो तो हात झटकत आहे. पंरतू भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित होत नाही, तोवर आमचा लढा सुरुच राहणार आहे.
युवा माळी संघाच्या अध्यक्षा सुनीता भगत म्हणाल्या की, आमच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून राज्यस्तरावर घोषित झाला. पंरतू, ज्या विद्येच्या माहेरघरात पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले जाते, त्याच शहरात ज्या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू झाली, तो भिडे वाडा दुर्लक्षीत राहतो ही मनाला वेदना देणारी गोष्ट आहे.








