जगात सर्वात शक्तीशाली मानली जाणारी अमेरिकेची सेना आता एक नवं साधन तयार करीत आहे. या सेनेच्या प्रयोगशाळांमध्ये एक अत्याधुनिक चष्मा तयार केला जात आहे. हा चष्मा घातलेल्या सैनिकाला काँक्रिटच्या भिंतीपलीकडचंही दिसू शकेल, असा दावा करण्यात येतोय. त्यामुळं बंदिस्त बंकर्समध्ये बसूनही अमेरिकेचे सैनिक बाहेर काय चाललं आहे, हे पाहू शकतील. तसेच शत्रूच्या बंकर्समध्ये काय चाललं आहे, याचंही दर्शन त्यांना घडू शकेल, असं सांगितलं जातंय. हे तंत्रज्ञान इंटिग्रेटेड व्हिज्युअल ऑगमेंटेशन सिस्टीम (आयव्हीएएस) या तांत्रिक नावानं ओळखलं जात आहे. हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आल्यास केवळ युद्धासाठीच नव्हे तर दहशतवाद, उग्रवाद आणि इतर समाजविरोधी कारवायांविरोधातही त्याचा प्रभावी वापर करता येईल, असं संशोधकांना वाटतं. बंदिस्त ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेणं, त्यांच्याकडे किती शस्त्रसामग्री आहे याचा अंदाज घेणं, हातघाईच्या लढाईत शत्रूच्या ताकदीचा अंदाज घेणं, त्याचप्रमाणं अंमलीपदार्थांची तस्करी करणारे गुन्हेगार व अंमलीपदार्थांचे साठे शोधणं हे या तंत्रज्ञानामुळं अधिक सुलभ होईल, असा अंदाज आहे. हे तंत्रज्ञान आता विकासाच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळं अमेरिकेच्या सेना दलांनी अशा 40 हजार चष्म्यांची ऑर्डर यापूर्वीच दिली आहे. हे चष्मे अंधारातही उपयोगी ठरतात.
केवळ भूसेनेलाच नव्हे तर लढाऊ विमान चालकांनाही हेडअप डिस्प्लेसाठी या चष्म्यांचं साहाय्य होऊ शकते. हा चष्मा परिधान केलेला विमानचालक आपल्या हेल्मेटच्या स्क्रिनवरच आजूबाजूचा सर्व हवाई प्रदेश पाहू शकतो. त्याला विमान चालविण्यासाठी योग्य ती दिशा दाखविण्याचं कामही हे साधन करू शकतं. तसेच शत्रूच्या विमानांचा वेधही घेऊ शकतं.
इतकंच नव्हे तर रायफल आणि मायक्रो ड्रोनच्या साहाय्यानं हा चष्मा शत्रूच्या प्रदेशात प्रवासही करू शकतो आणि तेथील महत्त्वाची माहिती सैनिकांपर्यंत पोहोचवू शकतो. एकंदर गुप्तहेरगिरी करण्यासाठी हे सर्वात सुरक्षित आणि सर्वात विश्वासार्ह साधन असेल, असं संशोधकांचं म्हणणं आहे.









