शशी थरूर हे संसद सदस्य त्यांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वामुळे विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांची काही इंग्रजी पुस्तके गाजली आहेत. फारसे वापरात नसलेले, अपरिचित, दुर्बोध शब्द लेखनात-ट्विटमध्ये वापरून खळबळ उडवून देण्यात त्यांचा हातखंडा आहे. गेल्या वषी त्यांनी एका इंग्रजी दैनिकात अशा शब्दांचा परिचय करून देणारे सदर लिहिले होते. प्रत्येक लेखात निवडलेला शब्द दुर्बोध असला तरी लेखन अगदी हलक्मयाफुलक्मया भाषेत असे. प्रत्येक लेखाच्या शेवटी त्या दुर्बोध शब्दाचा वाक्मयात उपयोग करताना लेखकाची मिश्किल टोमणेबाजी शिगेला पोचायची. वर्षभर या लेखनाने छान वाचनानंद दिला.
मागच्या रविवारी सदरातला शेवटचा लेख वाचताना मनात आले, आपल्या मराठीत विद्यमान राजकारणात सक्रिय असलेला एकही नेता असा का आठवू नये? मायमराठीच्या अंगाखांद्यावर बागडणारे, दंगामस्ती करणारे खटय़ाळ मूल कोणाही नेत्याच्या अंतरंगात का नसावे? कोणे एके काळी आचार्य अत्रे आणि केशवराव धोंडगे, नंतरच्या काळात केशवराव धोंडगे आणि शरद पवार यांच्या विधिमंडळात झालेल्या सवाल जवाबांना ललित किनार असे. विनोदांना किमान साहित्यिक दर्जा असे. मधू दंडवते यांच्या वक्तव्यांमध्ये उत्तम शाब्दिक कोटय़ा असत. नानासाहेब गोरे, ग. प्र. प्रधान यांनी भरपूर लेखन केले. पण त्याचा बाज नितांत गंभीर होता. अनेक उत्तम कवींनी, लेखकांनी विधानपरिषदेचे सदस्यत्व भूषविले. त्यापैकी कोणाच्याही नावावर एखादे खुमासदार भाषण वक्तव्य वाचनात-ऐकिवात नाही.
मागच्या पिढीतील काकासाहेब गाडगीळ केंद्रीय मंत्रिमंडळात होते. त्यांनी शिखांचा इतिहास, चाणक्मयाच्या ग्रंथाचा मराठी अनुवाद, सभाशास्त्र, समकालीन नेत्यांची व्यक्तिचित्रे, जर्मनीचे प्रवासवर्णन, ललित लेखांचे संग्रह, द्विखंडी आत्मचरित्र असे विपुल लेखन केले. 1962 साली साताऱयात झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. विठ्ठलराव गाडगीळ देखील केंद्रिय मंत्री होते. हजरजबाबी वक्तव्ये करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनीही राजकीय विषयावर विपुल लेखन केले. अनंत गाडगीळ सक्रिय राजकारणात आहेत. त्यांनी एका दैनिकात ‘चीअर्स’ किंवा तत्सम नावाने हलक्मयाफुलक्मया ललित लेखांचे सदर लिहिलेले आठवते. पण पूर्वी जसे खटकेबाज संवाद रंगत तसे आता उरले नाहीत. क्वचित कधीतरी कुठेतरी शरद पवार, अजितदादा पवार, नितीन गडकरी यांची एखादी कोटी किंवा सवाल जवाब ऐकायला मिळतात.
शशी थरूर यांच्याप्रमाणे कोणीतरी मराठी भाषेतल्या राजकीय वाङ्मयात भरीव योगदान द्यावे असे मनापासून वाटते.