भाषांतर करणे ही एक मजेदार कला आहे. लॉकडाऊनच्या काळात काही इंग्रजी पुस्तकांची मराठीत भाषांतरे करण्याचे काम मिळाले. त्यात मजेदार अनुभव आले. एखादं इंग्रजी वाक्मय चार-पाच अगदी सोप्या शब्दांचं आणि निरुपद्रवी दिसणारं असतं. पण मागच्या-पुढच्या वाक्मयांशी त्याचा सांधा जुळत नसेल तर गुगलवर इडियम्स आणि प्रेजेसच्या जंगलात चक्कर मारावी लागते. तिथे त्या वाक्मयाचा भलताच अर्थ असल्याचं लक्षात येतं. पण हा भलताच अर्थ त्या मसुद्यातल्या मागच्या आणि पुढच्या वाक्मयांशी सुसंगत निघतो.
आपण परक्मया भाषेत बोलताना आधी मनातल्या मनात मातृभाषेत विचार करतो. मग त्या वाक्मयाचं परक्मया भाषेत भाषांतर करून बोलतो. त्यामुळं आपल्याला ती भाषा उत्तम येत असली तरी अडखळत बोलायला होतं. भाषांतर करताना एक गोष्ट लक्षात आली. इंग्रजी मजकूर वाचताना अनेकदा त्याचा अर्थ मनात उमटायचा. पण मराठी शब्द पटकन आठवायचे नाहीत. मग शब्दकोशाकडे धाव. मनात आलं, आपल्या मेंदूला आपण एकाच वेळी दोन भाषांमध्ये इकडून तिकडे धावाधाव करायला लावतोय. मनातच मेंदूची क्षमा मागून टाकली.
साधारणपणे इंग्रजी आणि मराठी भाषांमधली जोडवाक्मयांची रचना एकमेकींच्या उलट असते. म्हणजे इंग्रजीत जोडवाक्मय आले तर मराठीत भाषांतर करताना त्यातले दुसरे वाक्मय आधी आणि पहिले वाक्मय नंतर करावे लागते. काही वेळा समोरच्या मजकुरात अशी छापील आठ-दहा ओळींची इंग्रजी वाक्मये आली की चिडचिड व्हायची. एका अपरात्री असेच एक भले मोठ्ठे वाक्मय आले. मग मी डोळे मिटून कल्पना केली की सुट्टीचा दिवस आहे. मी निवांत जमिनीवर पाय पसरून बसलो आहे. समोर चार-सहा उत्तम आंबे आहेत. आता आंबा काही उचलून तोंडात टाकायचा नसतो. तो हातात घेऊन न्याहाळायचा. स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा. कापायचा. आपण आंब्याची साल खात नाही. कोय खात नाही. आंबा सालीजवळ मधुर असतो. काही वेळा कोयीजवळ आंबट असतो. सालीजवळचा भाग मटकन खाऊन टाकायचा. कोयीजवळचा गर मोठय़ा वाडग्यात काढून त्यात साखर, सुंठ पावडर टाकायची. थोडंसं तूप चालेल. तसंच असतं भाषांतराचं काम. आंब्याच्या साली-कोयीप्रमाणे परभाषेतले वाक्प्रचार, म्हणी वगळायच्या. आमरसात साखर टाकतो, तसा भाषांतरात समांतर मराठी म्हणी शब्दप्रयोग वगैरेचा वापर करायचा. आंब्याच्या आठवणीत भाषांतर मजेत पार पडेल. आणि आंबा खाऊन कंटाळा आला तर एखाद्या वेळी सामिष पदार्थाची किंवा आणखीन वेगळी कल्पना करायला कोणी अडवलंय?