शहरातील अस्वच्छता पाहता अस्वच्छ शहर स्मार्ट बनू शकते का?
प्रतिनिधी/ बेळगाव
‘सुंदर शहर, स्वच्छ बेळगाव’ अशा म्हणीचा वापर शहराच्या स्वच्छतेसाठी केला जात होता. मात्र अलीकडे स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराचे सुशोभिकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. रस्ते, उद्यान आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून स्मार्ट सिटी बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण शहरातील अस्वच्छता पाहता अस्वच्छ शहर स्मार्ट बनू शकते का? असा मुद्दा उपस्थित होत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी बनविण्यासाठी वेळेवर कचऱयाची उचल होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आता भावी नगरसेवकांनी पाऊल उचलणे काळाची गरज आहे.
स्वच्छ भारत अभियान योजनेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. शहरात स्वच्छता राखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आटापिटा केला जातो. पूर्वी महापालिकेच्या स्वच्छता कामगारांकडून कचऱयाची उचल केली जात असे. पण शहराची व्याप्ती आणि कचऱयाचे प्रमाण वाढल्याने स्वच्छतेचे काम कंत्राट पद्धतीने देण्यात येते. 20 वर्षांपूर्वी महिन्याला चार ते पाच लाख रुपये स्वच्छतेसाठी मोजले जात असत. पण सध्या स्वच्छतेसाठी कोटय़वधीचा निधी खर्च केला जातो. महापालिका व्याप्तीमधील 47 वॉर्डांमधील कचऱयाची उचल आणि गटारी स्वच्छ करण्याची जबाबदारी कंत्राट पद्धतीने देण्यात आली आहे. यासाठी वर्षाला 20 कोटीच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. त्या व्यतिरिक्त कचऱयाचे विघटन आणि कचऱयाची वाहतूक करण्याकरिता महापालिकेकडून निधी खर्च केला जातो. तसेच 11 वॉर्डांमधील कचऱयाची उचल मनपाच्या स्वच्छता कामगारांकरवी केली जाते. तरीदेखील शहरातील कचरा व्यवस्थितपणे स्वच्छ केला जात नाही. गटारी स्वच्छ करण्याची जबाबदारीदेखील कंत्राटदार आणि महापालिकेच्या स्वच्छता कामगारांची आहे. मात्र गटारींची स्वच्छता व्यवस्थित केली जात नाही. स्वच्छतेबाबत नेहमीच नागरिकांच्या तक्रारी होत असतात. अलीकडे घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. पण नियमितपणे कचऱयाची उचल होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांमधून होत आहे.
कचऱयाची समस्या जैसे थे
स्मार्ट सिटी बनविण्यासाठी शासनाकडून एक हजार कोटीचा निधी खर्च केला आहे. शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, गटारींचे बांधकाम, उद्यानांचा विकास, फूटपाथ आणि डेकोरेटिव्ह पथदीप अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे शहराच्या स्वच्छतेसाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून रस्त्यांशेजारी कचरा टाकणाऱयांवर नजर ठेवण्यात येत आहे. तसेच घरोघरी जाऊन कचऱयाची उचल केली जाते का? याची माहिती घेण्यासाठी आरएफआयडी यंत्रणा बसविण्यात आली आहे. तरीदेखील शहरात कचऱयाची समस्या जैसे थे आहे. संपूर्ण शहर स्वच्छ आणि कचराकुंडीमुक्त बनविण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. तरीदेखील रस्त्यांशेजारी कचरा साचतोच. त्यामुळे कचरा साचण्यास कोण जबाबदार आहे? असा मुद्दा उपस्थित होत आहे.
अधिकाऱयांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज
शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी कोटय़वधीचा निधी खर्चून अत्याधुनिक यंत्रोपकरणे खरेदी करण्यात आली आहेत. तसेच चार पर्यावरण अभियंत्यांची नियुक्ती महापालिकेने केली आहे. पण त्याप्रमाणे शहराच्या स्वच्छतेचे काम होते का? याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कंत्राटदारांना कचऱयाची उचल करण्यासाठी इतके पैसे देऊनही कचऱयाची उचल वेळेवर केली जात नाही. कचरा जमा करण्यासाठी घरोघरी जाणारी वाहने नियमितपणे येत नाहीत. तसेच बहुमजली व्यापारी संकुलातील पहिल्या किंवा दुसऱया मजल्यावर कचरा घेण्यासाठी स्वच्छता कामगार येत नसल्याची तक्रार नागरिक करीत असतात.
स्वच्छता सेवाशुल्क आणि कचरा व्यवस्थापन शुल्क
कचऱयाची उचल करण्यासाठी प्रत्येक मालमत्ताधारकांकडून स्वच्छता सेवाशुल्क आणि कचरा व्यवस्थापन शुल्क असे दोन प्रकारचे कर आकारले जातात. पण कचऱयाची उचल करण्यास प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळे शहरवासियांना याचा त्रास सहन करावा लागतो. अलीकडे रहिवासी संकुलांची संकल्पना वाढत चालली आहे. प्रत्येक वसाहतीमध्ये बहुमजली रहिवासी संकुल असल्याने स्वच्छता कर्मचारी वेळेवर कचऱयाची उचल करण्यासाठी येत नाहीत. अशा तक्रारी सातत्याने होत असतात. त्यामुळे नागरी समस्यांपैकी कचऱयाची उचल ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
अस्वच्छतेमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या
प्रत्येक वसाहतीनुसार रस्त्यांची वर्गवारी करून स्वच्छतेचे काम करण्यात येते. त्यानुसार कचऱयाची उचल करणे, रस्त्यांवर झाडू मारणे, गटारी स्वच्छ करणे आदी कामे केली जातात. तर आठवडय़ातून एकदा किंवा दोन ते तीनवेळा गटारी स्वच्छ करण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर आणि स्वच्छता कामगारांवर सोपविण्यात आली आहे. पण ही कामे वेळेवर केली जात नसल्याने शहरातील गटारी तुंबल्या आहेत. परिणामी सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. तसेच अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.









