बाळेपुंद्री / वार्ताहर
भावाची मृत्यूची बातमी ऐकून दोघा बहिणींनी जीव सोडल्याची घटना बेळगाव तालुक्यातील पंतबाळेपुंद्री गावात मंगळवारी घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. अब्दुलमजीद गौससाहब जमादार (वय 57) असे मयत झालेल्या दुर्दैवी भावाचे नाव आहे. ते पंत बाळेपुंद्री ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष होते. तर हुसेनाबी मुक्तुंसाब मुल्ला (वय 64) राहणार पंतबाळेपुंद्री व सहाराबी संदी (वय 70) राहणार काकती असे मयत झालेल्या सख्ख्या बहिणींची नावे आहेत. मंगळवारी गावच्या स्मशानात तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याविषयी माहिती अशी की, अब्दुलमजीद हे गावच्या बसस्थानकाजवळ रसवंतीगृह व हॉटेलचा व्यवसाय करत होते. गेल्या काही वर्षापासून त्यांना मधुमेह होता. सोमवारी रात्री अचानक त्यांना छातीत दुखू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून बेळगावच्या खासगी इस्पितळात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यास दिरंगाई करून नो कोविडची वरदी असल्यास येथे उपचार करू असे सांगून त्यांना जिल्हा इस्पितळात पाठविले. तेथेही डॉक्टरांनी कोरोनाची वर्दी हातात सापडल्यास चिकित्सा करू, असे सांगून त्यांना वॉर्डमध्ये झोपण्यास सांगितले. त्यावेळी छातीत वेदना अधिक झाल्याने पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांच्या मृत्यू झाला. नंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे डॉक्टराच्या विरुद्ध मयताच्या कुटुंबियांनी आक्रोश व्यक्त केला. यावेळी वरिष्ठ डॉक्टरांनी संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले.
मंगळवारी अब्दुलमजीद यांचा मृत्यू झाल्याची बातमी गावात वाऱयासारखी पसरली. गावात राहणारी हुसेनाबी मुक्तुंसाब मुल्ला यांना भावाच्या मृत्यूची बातमी कळताच हृदयविकाराच्या तीव्र झटका येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिची मोठी बहीण काकती येथील सहाराबी संदी या भावाचा मृतदेह पाहण्यास आलेल्याक्षणी दु:ख अनावर झाल्याने मानसिक धक्का बसला व त्यानांही हृदयघाताचा झटका आल्याने मृत्यू झाला. तिघांचाही मृत्यू एकाच दिवसात झाल्याने कुटुंबाचा एकच आक्रोश झाला. दु:ख अनावर झाल्याने नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.









