कराडजवळ अपघातात भावी पोलीस तरुणी ठार
प्रतिनिधी/ कराड
सहलीवरून परतलेल्या बहिणीला भावाच्या डोळ्यादेखत भरधाव वाहनाने ठोकरल्याची दुर्दैवी घटना गोटे (ता. कराड) येथे घडली. या भीषण अपघातात निकिता दत्तात्रय जमाले (वय 18, रा. मुंढे, ता. कराड) ही तरुणी जागीच ठार झाली. पोलीस होण्यासाठी कष्ट घेत असलेल्या निकिताच्या स्वप्नांचा या अपघाताने शेवट केला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, निकिता जमाले ही पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होती. पोलीस होण्यासाठी ती अभ्यास करत होती. रविवारी रात्री ती सहलीवरून परत आली. आशियाई महामार्गावर ती वाहनातून उतरली. रात्रीची वेळ असल्याने तिला घरी नेण्यासाठी तिचा भाऊ आला होता. तो महामार्गाच्या पलीकडील बाजूला उभा होता, तर निकिता अलीकडील बाजूला होती. निकिता कोल्हापूर-पुणे लेन ओलांडून दुभाजकावर आली. पुणे-कोल्हापूर लेन ओलांडण्याच्या प्रयत्नात असतानाच भरधाव वेगाने आलेल्या सिल्व्हर रंगाच्या इनोव्हा कारने निकिताला जोराची धडक दिली. जोराच्या धडकेमुळे निकिता रस्त्यावर आपटली गेली. निकिताची वाट पहात असलेल्या भावासमोरच हा अपघात झाला. त्याने तत्काळ निकिताकडे धाव घेत तिला उचलले. महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. भावाने निकिताला सह्याद्री रुग्णालयात नेले. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. डोळ्यादेखत बहिणीचा झालेल्या मृत्यूने भाऊ सुन्न झाला. अपघाताची नोंद कराड शहर पोलिसांत झाली. अपघात विभागाचे खलील इनामदार, प्रशांत जाधव यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरून धडक दिलेल्या वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत.
.









