सुधाकर काशीद / कोल्हापूर
प्रेमात एकमेकावर भाळणे यात काही विशेष नाही. पण आयुष्यभर एकमेकाला सांभाळणे यातच प्रेमाचे सारे सार आहे. जगन्नाथ राशिवडेकर त्यांच्या साठ वर्षाच्या वैवाहिक वाटचालीबद्दल बोलत होते. राशिवडेकर काकांचं वय 85 आणि पुष्पा उर्फ मनोरमा काकींच वय 80. दोघेही आता सावली केअर सेंटरमध्ये राहतात. काकींची तब्येत जरा गुंतागुंतीची. काका मात्र मिलिटरीतून रिटायर. त्यामुळे कणखर. आयुष्यभर साथ दिलेल्या पण आत्ता बेडवर पडून असलेल्या आपल्या पुष्पाला एखाद्या फुलाप्रमाणे प्रमाणे जपतात. व्हॅलेंटाईन डे हा फक्त एक दिवसापुरते प्रेम व्यक्त करण्याचा दिवस नसतो. तर, आयुष्यभर एकमेकाला प्रेम देण्याचा आणि घेण्याचा अलिखित वचननामा असतो, याचा प्रत्यय काकांच्या प्रत्येक कृतीतून दिसत असतो.
गंगावेशीतील राशिवडेकर घराणे खूप मोठे. मोठा वाडा. त्याला दिंडी दरवाजा, दगडी चौक पाण्याचा हौद, हवेशीर खोल्या आणि प्रेमाने राहणारी माणसे. काकांचे लग्न कॉलेज ऑफ कॉमर्समधील प्राध्यापिका पुष्पा देशपांडे यांच्याशी झाले. त्या अकाउंटन्सीच्या प्राध्यापिका. कॉलेजमध्ये त्या इतक्या लोकप्रिय की, त्यांच्या तासाला कोणी दांडी मारली असं व्हायचं नाही. त्यांच्या हाताखाली किमान आठ ते दहा हजार विद्यार्थी शिकले. केवळ अकाउंटन्सीच नव्हे तर जीवनाच्या हिशोबातही ते यशस्वी ठरले.
जगन्नाथ काका आणि पुष्पा काकी यांचा संसार अपत्याच्या रूपात मात्र फुलला नाही. मात्र त्याची त्यांनी कधीच खंत बाळगली नाही. महिन्यापूर्वी मात्र हे दोघे सावली केअर सेंटरमध्ये दाखल झाले. काकींना उठता येत नाही. सर्व नैसर्गिक विधी जाग्यावरच करावे लागतात. केअर सेंटरमधील सहकारी जरूर त्यांना मदत करतात. वृद्धत्वात माणसं हट्टी होतात. त्याचप्रमाणे काकी देखील हट्टी झाल्या आहेत. त्यांना इडली-सांबार आणि चटणीची खूप आवड. सारखं तेच आणून द्या म्हणतात. सावलीच्या डॉ. किशोर देशपांडे यांनी तिखट खायचं नाही म्हणून सांगितलं म्हणून काका इडली सांबार आणून देणे टाळतात. पण काकीच्या हट्टापुढे कधीकधी हात टेकतात. मग इडलीबरोबर सांबार ऐवजी दूध साखर घेतात. अनेक वेळा इडली दुधात कालवून त्यांना चमचाने भरवतात. काकी तोंडाला चव नाही म्हणून थोडं तिखट मागतात. पण काकीच्या तब्येतीच्या काळजीने काका तिखट सोडून इतर खाद्य काकींना भरवतात. अशावेळी काकी चिडतात, रुसतात, एखाद्या लहान मुलाप्रमाणे हट्ट करतात, पण काका तेव्हाही अग माझं जरा ऐक की, अशी विनवणी करून तिचा रुसवा काढतात.
काकी बेडवरच असल्यामुळे त्यांना बाहेर रात्र आहे की दिवस हे कळत नाही. त्यामुळे त्या कधीकधी रात्रभर जाग्या असतात. आणि काकानांही माझ्या शेजारी बसा म्हणून त्या जागवतात. काका क्षणभर रागावतात. पण तिच्या शेजारीच बसून दोन तीन तास डुलकी काढतात. आयुष्यभर साथ दिलेल्या आपल्या पुष्पाला अखेरपर्यंत दुखवायचं नाही म्हणून आपल्या परीने सारं सहन करतात.
तरुणपणी बायकोला फुल, गजरा, आईक्रिम, चॉकलेट देणे खूप सोपे आहे. पण म्हातारपणी बायको अंथरुणात पडली की तीचं सगळं करायला तुम्ही नाक मुरडले की, समजायच तेथेच प्रेम संपले.
जगन्नाथ राशिवडेकर









