सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे सहकार्य
कोल्हापूर / प्रतिनिधी
भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नाटय़ अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. मराठी, हिंदी चित्रपट, दूरचित्रवाणीवरील मालिका, नाटके आणि वेबसिरीजमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या कोल्हापूरच्या कलाकाररूपी विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या रूपाने नाटय़ अभिनयाचे तज्ञांकडून शास्त्राsक्त शिक्षण मिळणार आहे. ही माहिती भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राचे विश्वस्त तथा कार्याध्यक्ष विजय गजबर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गजबर म्हणाले, गेल्या काही वर्षांत अभिनय करणाऱ्या कलाकारांसाठी विविध क्षेत्रे उपलब्ध झाली आहे. या क्षेत्रात छंद, आवड अथवा व्यवसाय म्हणून करिअर करू इच्छिणाऱया अभिनेते, अभिनेत्रींसाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या माध्यमातून आजवर असंख्य विद्यार्थ्यांनी यशस्वी कारकीर्द घडविली आहे. याच ललित केंद्राचा अभ्यासक्रम पुण्यानंतर आता कोल्हापुरात भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राच्या वतीने चालविला जाणार आहे. कोल्हापूरसह परिसरातील विद्यार्थ्यांना पुण्याच्या ललित कला केंद्राच्या प्रशिक्षण पद्धतीमध्ये शिकण्याची संधी आहे. इच्छुकांनी या सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विजय गजबर यांनी केले. पत्रकार परिषदेला कार्यवाह श्रीकांत डिग्रजकर केंद्र संचालिका सौ. अनघा पेंढारकर, उपकेंद्र संचालिका सौ. सुषमा गजबर, डॉ. हिमांशू स्मार्त, व्यवस्थापक उमेश बुधले उपस्थित होते.