वृत्तसंस्था/ दुबई
सध्या भारतीय फुटबॉल संघ संयुक्त अरब अमिरातच्या दौऱयावर आहे. या दौऱयात भारतीय संघ दोन मित्रत्वाचे आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळत आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात बलाढय़ ओमानला 1-1 असे बरोबरीत रोखले. आता भारताचा दुसरा सामना सोमवारी संयुक्त अरब अमिरातबरोबर होत आहे. या सामन्यात प्रशिक्षक स्टिमॅक भारतीय संघामध्ये नवोदितांना संधी देण्याचा प्रयोग करण्याच्या तयारीत आहेत.
गेल्या गुरुवारी भारतीय संघाने ओमानला बरोबरीत रोखले. या सामन्यात भारतीय संघाकडून दहा खेळाडूंनी आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. फिफाच्या मानांकन यादीत संयुक्त अरब अमिरात 74 व्या तर भारत 104 व्या स्थानावर आहे. गेल्या दशकामध्ये भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात चार सामने झाले असून त्यापैकी तीन सामने संयुक्त अरब अमिरातने जिंकले आहेत. सोमवारच्या सामन्यात प्रशिक्षक स्टिमॅक नवोदित खेळाडूंना मैदानात उतरविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भारतीय संघाचे नेतृत्व गुरुप्रित सिंग संधूकडे राहील.









