ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला भारत सरकार 40 हजार टनाची डिझेलची खेप पाठवणार आहे. हे डिझेल श्रीलंकेला पाठवण्यात येणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या सात मासिक शिपमेंट व्यतिरिक्त असेल. 500 दशलक्ष क्रेडिट लाईनच्या अंतर्गत इंडियन ऑईल कॉर्पोरेशन श्रीलंकेला ही डिझेलची खेप पाठवणार आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे जागतिक बाजारातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. दरम्यान, आधीपासूनच आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेत डिझेलचा मोठा तुडवडा आहे. परिणामी इंधन दरांनी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे श्रीलंकेने भारताकडे मदत मागितली होती. भारतानेही श्रीलंकेला डिझेलची खेप देण्याचे मान्य केले आहे.
दरम्यान, इंधनाच्या वाहतुकीची व्यवस्था करण्यातही अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. तेल मंत्रालय आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने या प्रकरणी पाठवलेल्या ई मेलला प्रतिसाद मिळालेला नाही. वाहतूक सुविधांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार आणि उद्योग एकमेकांबरोबर समन्वय साधत आहेत.









