भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांच्यात गुरूवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली आहे. भारताचे ऑस्टेलियाशी नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. त्यामुळे या भेटीचे तसे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तथापि, सध्याच्या परिस्थितीत या भेटीला वेगळे महत्त्व आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये गुरुवारीच एक करार झाला असून त्यानुसार दोन्ही देश आवश्यकता भासल्यास एकमेकांच्या सामरिक तळांचा उपयोग करणार आहेत. या करारामुळे ही भेट विशेषत्वाने महत्त्वाची ठरत आहे. 2009 मध्ये भारताने ऑस्टेलियाशी धोरणात्मक संबंध प्रस्थापित केले होते. त्यानंतर उत्तरोत्तर या संबंधांमध्ये वाढ होत गेली. आयात-निर्यात, गुंतवणूक आणि व्यापारही बऱयापैकी वाढला. भारत व अमेरिका यांच्यात अणुकरार झाल्यानंतर भारतावरची पुष्कळशी अणुबंधने उठविण्यात आली. परिणामी भारताचा जगातून वीजनिर्मितीसाठी अणुइंधन खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला. ऑस्ट्रेलिया हा अणुइंधन म्हणजेच युरेनियम समृद्ध देश आहे. त्यामुळे या देशाकडून अणुइंधन खरेदी करण्याची भारताची इच्छा असून त्या दिशेने काही वर्षांपूर्वीपासूनच पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच दोन्ही देशांची जवळीक सर्व क्षेत्रांमध्ये वाढत असल्याचे दिसून येते. तथापि, या सर्व व्यवहारांमध्ये सागरी सामरिक तळांसंबंधी सहकार्य करण्याचा नवा करार अधिक वैशिष्टय़पूर्ण आहे असे म्हणता येते. वास्तविक ऑस्ट्रेलिया हा देश भारतापासून बराच दूर आहे. दोन्ही देशांसमोरील आव्हाने भिन्न आहेत. भारताला पाकिस्तान आणि चीन हे उपद्रवी शेजारी लाभले आहेत. तशी ऑस्ट्रेलियाची परिस्थिती नाही. त्यामुळे एकमेकांच्या सामरिक तळांचा त्यांना उपयोग काय होणार व अशी कोणती परिस्थिती उद्भवू शकेल की, त्यांना असा उपयोग करावा लागेल, असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होऊ शकतो. सर्वसामान्य परिस्थितीत दोन्ही देशांना एकमेकांच्या सामरिक तळांचा उपयोग करण्याची वेळ येणार नाही. पण सध्याची स्थिती तितकीशी सर्वसामान्य नाही. जगाला विळखा घातलेल्या कोरोना संकटाची तिला पार्श्वभूमी आहे. हा विषाणू चीनमधून जगात पसरला. चीनने जगाला त्याच्या धोक्याविषयी (पूर्ण कल्पना असूनही) वेळीच सावध केले नाही, असा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर चीननेच हा विषाणू तयार केला आणि जगात पसरविला, अशीही चर्चा अनेकजण करतात. या आरोपांमध्ये तथ्य किती हे सखोल चौकशी झाल्यानंतरच बाहेर येणार आहे. मात्र, सध्या साऱया जगाची दृष्टी चीनबद्दल संशयाची बनली आहे, हे निश्चित. चीनवर संशय व्यक्त करणाऱया देशांमध्ये अमेरिका व काही युरोपियन देशांसह ऑस्ट्रेलियाचाही समावेश आहे. यामुळे ऑस्टेलिया व चीन यांच्यात काहीसे वितुष्ट निर्माण झाल्याचे दिसून येते. भारत आणि चीन यांच्यात गेल्या महिनाभरापासून लडाख सीमारेषेवर तणाव निर्माण झाला आहे. तसेच अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि उत्तराखंड येथींल सीमेनजीकच्या भागात चीनने कुरापती काढल्या आहेत. हिंदी महासागरात चीनने आपल्या नौदलाचे सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून चालविला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सावध होणे साहजिक आहे. म्हणजेच, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश एकमेकांपासून दूर असले तरी चीनचे आव्हान दोघांसमोरही असल्याचे दिसते. यामुळेच त्यांनी भविष्यावर दृष्टी ठेवून आतापासूनच सामरिक सज्जता ठेवण्याचा व सामरिक सहकार्य करण्याचा विचार केलेला दिसतो. त्यामुळे एकमेकांचे सागरी सामरिक तळ आवश्यकतेनुसार उपयोगात आणण्याचा करार केला असल्याची शक्यता आहे. याशिवाय कोरोना विषाणूच्या विरोधात एकमेकांच्या सहकार्याने लढण्याविषयीही दोन्ही देशांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून अद्यापही जगात कोठेही परिस्थिती नियंत्रणात आली आहे असे खात्रीपूर्वक म्हणण्याची स्थिती नाही. त्यामुळे लवकरात लवकर या विषाणूवर प्रभावी व सुरक्षित औषध किंवा लस यांचा शोध लागल्याशिवाय गत्यंतर नाही. औषध किंवा लस लवकर मिळावयाची असेल तर सर्व देशांना एकमेकांशी सहकार्य करतच प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यादृष्टीनेही भारत व ऑस्ट्रेलिया एकमेकांना उपयुक्त ठरू शकतात. एकंदर, सामरिक संबंध असोत किंवा कोरोनासंबंधी सहकार्य असो, आज दोन्ही देशांना एकमेकांची अधिकच आवश्यकता भासू लागली आहे हे स्पष्ट आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणतेही निश्चित तत्त्व नसले तरी परिस्थितीनुसार त्यांची तीव्रता कमी अधिक होत असते. तीव्रतेनुसार संबंधांची परिमाणे बदलतात. प्रशांत महासागरीय प्रदेशतही चीनची महत्त्वाकांक्षा वाढत आहे. परिणामी या प्रदेशातील देश ज्यांना ‘पॅसिफिक रिम नेशन्स’ म्हटले जाते अशा देशांना चिंता वाटू लागली आहे. प्रशांत महासागरीय प्रदेशाशी भारताचा तसा थेट संबंध नाही. तरीही दक्षिण आशियातील एक सामर्थ्यवान देश या नात्याने भारताने या प्रदेशात सक्रिय भूमिका बजावावी अशी अमेरिका व ऑस्ट्रेलियाची इच्छा दिसते. या देशांनी या प्रदेशाला आता भारतीय प्रशांतीय क्षेत्र (इंडो पॅसिफिक रीजन) असे संबोधण्यास प्रारंभ केला आहे, यावरून भारताचे वाढते महत्त्व लक्षात येते. या साऱया पार्श्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या नेत्यांमधील ही भेट पहावी लागते. कोणत्याही देशाशी मैत्री नेहमी समर्थनीय असतेच. पण जेव्हा परिस्थितीनुसार अशा देशांसमोर समान आव्हाने निर्माण होतात, तेव्हा त्यांच्यातील संबंधांना विशेष अर्थ प्राप्त होतो. या दोन्ही देशांबरोबरही असेच होत आहे असे दिसते. त्यामुळे सहकार्याची नवी पातळी त्यांच्याकडून गाठली गेली. शिवाय दोन्ही देश लोकशाहीप्रधान असणे, भारतातील विद्यार्थ्यांसाठी ऑस्ट्रेलिया हे शिक्षण आणि नोकरी यांचे आकर्षण केंद्र असणे, ऑस्ट्रेलियातील विपुल खनिज संपत्तीची भारताला असलेली आवश्यकता इत्यादी मुद्दे आहेतच. दोन्ही देशांमधील हे सहकार्य वाढते राहील आणि एकमेकांचा उपयोग त्यांना होत राहील, हे आता अधिकाधिक स्पष्ट होत आहे.
Previous Articleचीन-अमेरिकेदरम्यान ‘हवाई’ शीतयुद्ध
Next Article अमेरिकेत अँटीबॉडीद्वारे औषधाची निर्मिती
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








