पाहुण्या विंडीजविरुद्ध आज दुसरी वनडे, केएल राहुलच्या फलंदाजी क्रमाबाबत उत्सुकता
अहमदाबाद / वृत्तसंस्था
यजमान भारतीय क्रिकेट संघ आज (बुधवार दि. 9) विंडीजविरुद्ध होणाऱया दुसऱया वनडे सामन्यात एकतर्फी मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघाने पहिल्या वनडेत 6 गडी राखून सहज विजय संपादन केला होता. तीच विजयी घोडदौड येथेही कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल. ही लढत दुपारी 1.30 पासून खेळवली जाणार आहे.
यापूर्वी, पहिल्या वनडेत यजुवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर यांच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजचा डाव अवघ्या 176 धावांमध्ये खुर्दा झाला आणि त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने 60 धावांची संयमी खेळी साकारल्यानंतर भारताने सहज विजय संपादन केला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत धोंडशिरेच्या दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या रोहितने येथे दमदार पुनरागमन केले, ही भारतासाठी दिलासादायक बाब ठरली. आजच्या लढतीतही तो निष्प्रभ विंडीज गोलंदाजी लाईनअपवर तुटून पडला तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल. अगदी इशान किशनला देखील हीच बाब लागू होते. त्याने पहिल्या वनडेत 36 चेंडूत 28 धावांची खेळी साकारली होती.

या लढतीत केएल राहुल उपलब्ध असल्याने त्याला कर्णधार रोहितसमवेत सलामीला पाठवले जाणार की मध्यफळीत खेळवले जाणार, याची उत्सुकता असेल. केएल राहुल यावेळी वैयक्तिक कारणामुळे पहिल्या वनडेत खेळू शकला नव्हता. केएल राहुलला सलामीला धाडण्याचा निर्णय झाल्यास झारखंडचा डॅशिंग फलंदाज किशनला संघातून बाहेर व्हावे लागण्याची शक्यता अधिक असेल.
माजी कर्णधार विराट कोहलीसाठी देखील हा सामना महत्त्वाचा असेल. मागील 2 वर्षांपासून एकही शतक झळकावू न शकलेल्या विराटने हा दुष्काळ संपुष्टात आणण्याची अपेक्षा असणार आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यास धावांचा डोंगर उभा करणे, हे त्यांचे मुख्य लक्ष्य असेल. गोलंदाजीच्या आघाडीवर चहल व वॉशिंग्टन पुन्हा एकदा विंडीजसमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असतील. अर्थात, या दोघांपैकी एकाला वगळत डावखुरा ऑफस्पिनर कुलदीप यादवला संधी दिली जाणार का, हे पहावे लागेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयांक अगरवाल, रुतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकुर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान, शाहरुख खान.
विंडीज ः केरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऍलन, बॉनर, डॅरेन ब्रेव्हो, ब्रूक्स, जेसॉन होल्डर, शाय होप, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रॅन्डॉन किंग, निकोलस पूरन, केमर रोश, रोमारिओ शेफर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वॉल्श ज्युनियर.
सामन्याची वेळ ः दुपारी 1.30 वा.
16 पैकी 10 सामन्यात विंडीज कोटा पूर्ण करण्यातही अपयशी!
मालिकेत पिछाडीवर असलेल्या विंडीज संघाला बरोबरी साधण्यासाठी विशेषतः फलंदाजीच्या आघाडीवर व्यापक सुधारणा करावी लागेल, हे निश्चित आहे. मागील 16 सामन्यात तब्बल 10 वेळा ते अगदी 50 षटकांचा कोटा देखील पूर्ण करु शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती मात्र त्यांच्यासाठी डोळय़ात अंजन घालणारी ठरली आहे. विद्यमान विंडीज संघात निकोलस पूरन, केरॉन पोलार्डसारखे दिग्गज हार्ड हिटर्स आहेत. मात्र, त्यांचा खेळ बहरणे अद्याप बाकी आहे. गोलंदाजीच्या आघाडीवर अल्झारी जोसेफचा बॅड पॅच त्यांच्यासाठी चिंतेचा आहे. पहिल्या सामन्यात विशेषतः रोहितने त्याच्या गोलंदाजीचा उत्तम समाचार घेतला होता.
शिखर धवन, श्रेयस अय्यरची कोरोनावर मात
डावखुरा फलंदाज शिखर धवन व युवा आधारस्तंभ श्रेयस अय्यर यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना सराव सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. शिखर व श्रेयस यांची कोरोना चाचणी झाली व त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रुतुराज अद्याप आयसोलेशनमध्ये आहे, असे यावेळी सांगण्यात आले. विंडीजविरुद्ध पहिल्या वनडेपूर्वी श्रेयस अय्यर, धवन, रुतुराज, नवदीप सैनी यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आणि यामुळे या सर्व खेळाडूंना पहिल्या वनडेत खेळता आले नव्हते.
कोट्स
कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला उतरण्याची माझी तयारी आहे. तिसऱया, चौथ्या, पाचव्या अशा कोणत्याही क्रमांकावर मी फलंदाजी करु शकतो. संघव्यवस्थापनानेच याबाबत निर्णय घ्यायचा आहे.
-भारताचा मध्यफळीतील फलंदाज सुर्यकुमार यादव









