द्विपक्षीय संबंध दृढमूल करण्यासाठी कृती योजना सज्ज : कृषी क्षेत्रात सहकार्यावर विशेष भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि ब्राझिल या तिसऱया जगातील दोन मोठय़ा देशांमध्ये शनिवारी 15 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱया करण्यात आल्या आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांशी सहकार्य वाढविण्यासाठी कृती योजना तयार केली असून तिची अंमलबजावणी त्वरित केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या दौऱयावर आलेले ब्राझिलचे अध्यक्ष जैर मेसियास बोलसोनारो यांच्यातील चर्चेनंतर हे करार करण्यात आले आहेत.
संरक्षण, व्यापार आणि कृषी तसेच नागरी, हवाई वाहतूक, ऊर्जा, पर्यावरण, आरोग्य आणि शास्त्राrय संशोधन या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकमेकांच्या अधिक जवळ येणार आहेत. द्विपक्षीय व्यापार वाढविणे आणि सध्याच्या व्यापारातील विसंगती दूर करणे हे उद्देश दृष्टीसमोर ठेवून दोन्ही देश कार्य करणार आहेत.
दहशतवादाला विरोध
आंतरराष्ट्रीय दहशतवादाची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी दोन्ही देश परस्परांना सहकार्य करणार आहेत. यासाठी त्यांच्यात स्वतंत्र करार करण्यात आला आहे. त्यानुसार आपापल्या देशात कार्यरत असणाऱया दहशतवादी गटांची माहिती एकमेकांना देणे, दहशतवाद्यांना आर्थिक साहाय्य मिळणार नाही, याची दक्षता घेणे. तसेच दहशतवाद्यांचा शस्त्रपुरवठा रोखणे यासाठी दोन्ही देश कार्य करणार आहेत.
द्विपक्षीय व्यापार वाढवणार
2018-19 या आर्थिक वर्षात भारत आणि ब्राझिल यांच्यात 8.2 अब्ज डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार झाला. भारताने ब्राझिलला 3.8 अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तू निर्यात केल्या. तसेच ब्राझिलकडून 4.4 दशलक्ष डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या. हा परस्पर व्यापार येत्या दहा वर्षात तिप्पट करण्याचा निर्धार दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला. द्विपक्षीय व्यापार वाढविण्यासाठी अद्याप भरपूर संधी आहे, असे मत दोन्ही देशांच्या नेत्यांनी व्यक्त केले.
ब्राझिल हा दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा देश आहे. त्याची लोकसंख्या 21 कोटी असून त्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार 1.8 लाख कोटी डॉलर्स इतका प्रचंड आहे. भारताच्या तुलनेत तो चौपट मोठा आहे. भारत ब्राझिलकडून कच्चे इंधन तेल, सोने, खाद्यतेले, साखर आणि खनिज पदार्थ विकत घेतो. ब्राझिलमध्ये भारताची गुंतवणूक असून ती सध्या 6 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
संयुक्त निवेदन
पंतप्रधान मोदी व बोलसोनारो यांच्यात चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन दिले. दोन्ही देशांमध्ये मोठे भौगोलिक अंतर असूनही अनेक आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांवर त्यांचे एकमत आहे. त्याच एकमताचा लाभ घेऊन परस्परांशी अधिक दृढ व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याचा आमचा निर्धार आहे, अशी भलावण पंतप्रधान मोदी यांनी केली. दोन्ही देशांमधील संबंध मजबूत आहेतच, ते अधिक दृढ करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. भारताला आम्ही अत्यंत महत्त्व देतो, असे प्रतिपादन बोलसोनारो यांनी संयुक्त निवेदनात केले आहे.
बोलसोनारो प्रमुख अतिथी
यंदाच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलसोनारो भारतात आले आहेत. ते पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत राजपथावरील संचलनाचे निरीक्षण करणार आहेत. ते शुक्रवारी संध्याकाळी सहकुटुंब भारतात आले. त्यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्यासमवेत मोठी व्यापारी शिष्टमंडळही आहे. 1A961 नंतर भारताला भेट देणारे ते ब्राझिलचे प्रथम राष्ट्रपती ठरले आहेत. आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि पूर्व आशियाई देशांशी भारत संबंध बळकट करीत आहे. याच धोरणाचा भाग म्हणून बोलसोनारो यांची भारतभेट होत आहे.









