कनिष्ठ पुरुष गटातील हॉकी विश्वचषक स्पर्धा
वृत्त संस्था/ भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत रविवारी यजमान भारत आणि फ्रान्स यांच्यात कास्यपदकासाठी लढत होईल. प्राथमिक गटातील झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारतीय हॉकी संघाला लाभली आहे. या स्पर्धेतील विद्यमान विजेत्या भारताला यावेळी मात्र आपले जेतेपद कायम राखता आले नाही.
शुक्रवारी या स्पर्धेतील झालेल्या उपांत्य सामन्यात बलाढय़ जर्मनीने भारताचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न अधुरे राहिले. जर्मनीने आतापर्यंत सहावेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे. जर्मनी आणि अर्जेंटिना यांच्यात रविवारी जेतेपदासाठी सामना होईल. यजमान भारताला या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात फ्रान्सकडून 4-5 अशा गोलफरकाने पराभवाला सामारे जावे लागले. रविवारी होणाऱया सामन्यात भारतीय संघाला मागील पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळाली आहे. सध्या ‘जवाद’ या नव्या निर्माण झालेल्या वादळाने देशभरातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. या वादळामुळे भुवनेश्वरमध्ये पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.









