ऑनलाईन टीम / उस्मानाबाद :
पाकिस्तानमधील कथित प्रेयसीला भेटण्यासाठी दुचाकीवरुन निघालेल्या उस्मानाबादमधील 20 वर्षीय तरुणाला भारत-पाक सीमेवर सीमा सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहे.
झिशान सिध्दिकी (वय 20) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झिशान हा आपल्या कथित पाकिस्तानी प्रेयसीला भेटण्यासाठी दुचाकीवरुन पाकिस्तानला निघाला होता. गुरुवारी रात्री 9.30 च्या सुमारास त्याला भारत-पाक सीमेवर सीमा सुरक्षा दलाने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात हा तरुण उस्मानाबादवरून इथपर्यंत कसा पोहचला यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून झिशानची पाकिस्तानच्या तरुणीशी ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. याच प्रियसीला भेटण्यासाठी झिशान उस्मानाबादहून अहमदनगरपर्यंत सायकलवर गेेला. तिथून तो गुजरातलामोटार सायकलवर पोहचला. तिथून तो पुढे पायी चालत भारत-पाक सीमेजवळ पोहोचला. त्याची दुचाकी वाळूमध्ये अडकल्यानंतर तो पायी चालत पाकिस्तानला जाणार होता. सुरक्षा दलाला वाळूत अडकलेली एक दुचाकी सापडल्यानंतर त्यांनी शोध मोहीम सुरू केली. यानंतर त्यांनी झिशानला ताब्यात घेतले. त्यावेळी तो महाराष्ट्रातला असल्याचे स्पष्ट झाले. उस्मानाबाद पोलिसांची एक तुकडी या मुलाला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाली आहे. मुलाच्या दाव्यात किती तथ्य आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.









