ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताचा इतिहास आव्हानांनी भरलेला आहे. त्यामुळे एका वर्षात एक संकट येवो अथवा 50 संकटे येवोत, भारत न डगमगता त्याचा सामना करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
मोदींनी आज मन की बात कार्यक्रमात देशवासियांना संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले, शेकडो आक्रमकांनी आमच्या देशांवर हल्ले केले. त्यामुळे भारत अधिक भव्य बनला आहे. एक संकट येवो अथवा 50 येवोत भारत न डगमगता त्याचा सामना करेल. हे वर्ष खराब असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पहिले सहा महिने खराब गेले म्हणून संपूर्ण वर्षच खराब मानण्याची बिल्कूल गरज नाही. भारताचा इतिहास संकटांवर मात करण्याचा राहिला आहे.
जेव्हा-जेव्हा देशावर संकटं आली तेव्हा नवनिर्मिती होत गेली, संशोधन होत राहिले, नवे शोध लागले, नवीन साहित्य रचले गेले. त्यामुळे डगमगून जाण्याची गरज नाही. यंदा देशात अनेक संकटं उभी ठाकली आहेत. कोरोनाची लढाई दीर्घकाळ सुरू आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी पूर्व किनारपट्टीवर अम्फान तर पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ आले. आता टोळधाडीने दिल्लीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. तसेच देशातील काही भागांमध्ये छोटे-छोटे भूकंप थांबायचे नावच घेत नाहीत.
तसेच पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावादावरून भारत आणि चिनी सैन्यात हिंसक संघर्ष झाला. यात भारताने चीनला करारा जबाब दिला आहे. देशाकडे डोळे वर करून पाहणाऱ्यांचे डोळे काढण्याची ताकद भारतीयांच्यात आहे, असेही मोदी म्हणाले.









