नेपाळच्या विदेशमंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त, मध्यस्थीचीही तयारी
वृत्तसंस्था/ काठमांडू
भारत जर बांगलादेश बरोबरचा आपला सीमावाद संपवू शकतो तर नेपाळ बरोबरचा सीमावाद का संपणार नाही? असे प्रतिपादन नेपाळचे विदेशमंत्री प्रदीपकुमार ग्यवाली यांनी व्यक्त केला आहे. तसेच भारत-पाकिस्तान वादातही नेपाळ मध्यस्थी करू शकेल, असे विधान करून खळबळ उडवून दिली आहे.
नोव्हेंबरमध्ये भारताने जम्मू-काश्मीरचा नवा नकाशा प्रसिद्ध केला. यात पाकव्याप्त काश्मीरचा प्रदेशही भारताचाच असल्याचे दाखविण्यात आले आहे. तर गिलगिट आणि बाल्टिस्थानचा समावेश लडाखमध्ये करण्यात आला आहे. नेपाळच्या म्हणण्यानुसार भारताच्या नकाशात दाखविण्यात आलेले लिम्पियाधुरा, लिपुलेक आणि कलापानी हे प्रदेश नेपाळचे आहेत. तथापि, भारताने या दाव्याचा इन्कार केला असून भारताचा नकाशा पूर्वीप्रमाणेच दाखविण्यात आल्याचे म्हटले आहे.
भारत आणि नेपाळमधील सीमावाद ही इतिहासाची देणगी आहे. दोन्ही देशांना ती स्वीकारावी लागणार आहे. जो तोडगा काढायचा तो सामोपचाराने झाला पाहिजे. वादांचा ऐतिहासिक वारसा आता झुगारून देण्याची वेळ आली असून दोन्ही देशांनी नव्या जोमाने संबंध प्रस्थापित केले पाहिजेत, अशी सूचना ग्यवाली यांनी केली.
पाकला देण्यास तयार
सार्क संस्थेचे अध्यक्षपद पाकिस्तानकडे सोपविण्यास नेपाळ उत्सुक आहे, असे विधान प्रदीपकुमार ग्यवाली यांनी केले. भारत आणि पाकिस्तान एकमेकांमधील वाद सामोपचाराने मिटवतील. पण आम्हाला दोन्ही देशांनी सांगितल्यास नेपाळही त्यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो, असेही विधान ग्यवाली यांनी केले. भारताने या विधानाला आक्षेप घेतला असून कोणत्याही तिसऱया देशाची मध्यस्थी भारत कधीच स्वीकारत नाही, असे सांगण्यात आले आहे.









