फलंदाज विराट कोहली, कर्णधार केएल राहुल यांच्या कामगिरीकडे लक्ष, वेंकटेश अय्यरला संधी शक्य
वृत्तसंस्था/ पार्ल
भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना आज (बुधवारी) येथे होत असून गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच विराट कोहली एक खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे तसेच कसोटीचा संभाव्य कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वावर सर्वांचे लक्ष असणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सामन्याला प्रारंभ होणार आहे.
यावेळी मैदानावर फलंदाजी करताना असो किंवा सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना असो, कोहलीच्या प्रत्येक हालचालीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. मात्र त्याचवेळी राहुलकडेही कर्णधार या नात्याने लक्ष असणार आहे. कर्णधार असताना कोहली मैदानावर नेहमी आक्रमकतेने वावरायचा. तोच मूड तो कायम ठेवणार की, त्यात थोडा मवाळपणा आलेला दिसणार हे पहावे लागेल. तिसरी कसोटी झाल्यानंतर कोहलीने अनपेक्षितपणे कर्णधार सोडण्याचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला होता. त्यामुळे तो आता कोणत्याच संघाचा कर्णधार असणार नाही. वनडे व टी-20 चे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपविण्यात आले आहे. मात्र रोहित दुखापतग्रस्त असल्याने तो या दौऱयावर येऊ शकला नाही. त्याच्याजागी केएल राहुल नेतृत्व करणार आहे. कोहलीने टी-20 संघाचे नेतृत्व स्वतःहून सोडले होते. पण वनडे संघाचे नेतृत्व सोडण्याची त्याची तयारी नव्हती. निवड समितीने त्याला वनडेचे नेतृत्व सोडण्यास भाग पाडले होते. त्यावरून मंडळ व कोहली यांच्यात बराच वादही झाला होता.
मंडळाशी झालेले मतभेद मागे सारून कोहली या सामन्यापासून नवी सुरुवात करेल आणि सर्वांना बॅटनेच उत्तर देईल, अशी सर्वांची अपेक्षा आहे. गेल्या दोन वर्षापासून त्याला शतक नोंदवता आलेले नाही. आता नेतृत्वाचे ओझे कमी झाल्याने त्याला फलंदाजीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येईल आणि शतकी खेळीची अपेक्षा तो पूर्ण करेल, अशी सर्वाना आशा वाटते. राहुल नवा कर्णधार असल्याने या मालिकेत तो कोहलीचा सल्ला निश्चितच घेईल. कोहली फक्त फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभच आहे, असे नव्हे तर उपकर्णधार बुमराहने म्हटल्याप्रमाणे कोहली संघात नेहमी नेताच म्हणून राहणार आहे.
राहुल सलामीस येणार?
नवा कर्णधार व सहायक स्टाफच्या साहय़ाने या मालिकेकडे पुढील वर्षी होणाऱया विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. याशिवाय मागील आठवडय़ात कसोटी पराभवाने आलेली निराशाही दूर करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये भारताने मायदेशात इंग्लंडविरुद्ध पूर्ण ताकदीचा संघ उतरवला होता. त्यानंतर जुलैमध्ये लंकेविरुद्ध दुय्यम संघ पाठविण्यात आला होता. इंग्लंडविरुद्ध राहुल मध्यफळीत खेळला होता. पण यावेळी तो शिखर धवनसमवेत पुन्हा सलामीस येतो का, हे पहावे लागेल. आयपीएल व स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार प्रदर्शन करून संघात स्थान मिळविलेल्या रुतुराज गायकवाडला त्यामुळे वनडे पदार्पणासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. शिखर धवनने टी-20 संघातील स्थान याआधीच गमविले आहे. वनडेमधील स्थान टिकविण्यासाठी त्याला या तीन सामन्यांचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा लागेल. दबावाखाली तो अपयशी ठरल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. रोहितच्या गैरहजेरीत त्याला आपले स्थान भक्कम करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
मागील दौऱयात भारताने द.आफ्रिकेवर 5-1 असा एकतर्फी मालिकाविजय मिळविला होता. यामुळे भारताला थोडा दिलासा मिळू शकतो. पण कसोटी मालिका जिंकल्याने तेम्बा बवुमाच्या संघाचा आत्मविश्वासही दुणावलेला आहे. कसोटीतून निवृत्ती घेतलेला यष्टिरक्षक क्विन्टॉन डी कॉक यापुढे फक्त मर्यादित षटकांच्या सामन्यांत खेळताना दिसणार आहे. कसोटी मालिका गाजविणारा पेसर मार्को जान्सन भारतीय फलंदाजांना पुन्हा त्रास देऊ शकतो. तो पहिल्यांदाच वनडेमध्ये खेळणार आहे. कसोटीप्रमाणे वनडे मालिकाही चुरशीची होईल अशी अपेक्षा केली जात आहे.
संभाव्य संघ ः भारत ः केएल राहुल (कर्णधार), बुमराह (उपकर्णधार), धवन, रुतुराज गायकवाड, कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, रिषभ पंत, इशान किशन, चहल, अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकुर, सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी.
द.आफ्रिका ः तेम्बा बवुमा (कर्णधार), केशव महाराज, क्विन्टॉन डी कॉक, झुबेर हामझा, मार्को जान्सन, जानेमन मलान, सिसांदा मगाला, मॅरक्रम, मिलर, एन्गिडी, वेन पार्नेल, फेहलुक्वायो, प्रिटोरियस, रबाडा, शमसी, व्हान डर डय़ुसेन, व्हेरेन.
सामन्याची वेळ ः दुपारी 2 वाजता.
वेंकटेश अय्यरला संधी मिळण्याची शक्यता

कोहली नेहमीप्रमाणे तिसऱया क्रमांकावर फलंदाजीस येईल तर चौथ्या स्थानासाठी श्रेयस अय्यर किंवा सूर्यकुमार यादव यापैकी एकाला संधी मिळेल. पंत पाचव्या स्थानावर येण्याची अपेक्षा आहे तर अष्टपैलू वेंकटेश अय्यरला वनडे पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. निवड झाल्यास तो सहाव्या क्रमांकावर येईल. यजुवेंद चहल व चार वर्षानंतर वनडेत पुनरागमन करणारा अश्विन फिरकीची बाजू सांभाळतील तर बुमराह, भुवनेश्वर जलद गोलंदाजीचे आक्रमण सांभाळतील. तिसऱया पेसरसाठी दीपक चहर, शार्दुल ठाकुर किंवा प्रसिद्ध कृष्णा यापैकी एकाला निवडतील.









