ऑनलाईन टीम / बीजिंग :
गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षात चीनच्या कमांडिंग ऑफिसरसह 16 सैनिक मारले गेल्याची कबुली चीनने दिल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात 15 आणि 16 जूनला भारत-चिनी सैन्यात हिंसक संघर्ष झाला. यामध्ये भारताचे 20 जवान मारले गेले होते. तर 70 जवान जखमी झाले होते. या संघर्षात चीनचे किती जवान मारले गेले याचा आकडा चीनने जाहीर केला नव्हता. एका वृत्तसंस्थेने या संघर्षात चीनचे 43 जवान मारले गेल्याचे वृत्त दिले होते. तसेच अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या अहवालात चीनचे 35 सैनिक मारले गेल्याचे म्हटले होते.
मात्र, मागील आठवड्यात चीनने राजनैतिक आणि लष्करी चर्चेत या संघर्षात कमांडिंग ऑफिसरसह 16 सैनिक मारले गेल्याची कबुली दिली आहे. मागील महिनाभरापासून लडाख आणि सिक्कीम सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने असून, त्यांच्यात तणावाचे वातावरण आहे.









