दोन्ही देशांदरम्यान कोअर कमांडरस्तरीय बैठकीत चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि चीन यांच्यात लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मे महिन्यापासून चाललेला तणाव लवकरच संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या सैन्यांनी 3 टप्प्यांत माघार घेण्याच्या योजनेस सहमती दर्शविली आहे. यानंतर दोन्ही बाजूचे सैन्य एप्रिल-मेपूर्वीच्या त्यांच्या जुन्या जागांवर परत जाईल. 2021 च्या मे महिन्यापर्यंत स्थिती पूर्ववत होईल आणि चीन सीमेच्या नजीक तैनात केलेले आपले 400 रणगाडेही मागे घेईल.
दोन्ही देशांदरम्यानची आठवी कोअर कमांडरस्तरीय बैठक गेल्या आठवडय़ात 6 रोजी चुशूल येथे झाली होती. यात 3 टप्प्यांत माघार घेण्याच्या योजनेवर चर्चा झाली. पँगाँग सरोवर क्षेत्रात ही चर्चा झाल्यापासूनच्या एका आठवडय़ात योजना तयार होईल, असे सूत्रांनी सांगितले. बैठकीला परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव नवीन श्रीवास्तव आणि ‘मिलिटरी ऑपरेशन्स’च्या ‘डायरेक्टोरेट जनरल’चे ब्रिगेडिअर घई उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात रणगाडे, तोफा हलविणार
या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात दोन्ही देश रणगाडे, तोफा आणि सशस्त्र वाहने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (एलएसी) लक्षणीय अंतरावर हलवतील. दोन्ही देशांमधील चर्चेनुसार, एका दिवसाच्या आत रणगाडे आणि सैन्याची वाहने त्यांच्या जुन्या ठिकाणी परत पाठविली जातील. योजनेच्या दुसऱया टप्प्यात पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील काठावरील परिसरातील दोन्ही बाजूचे सैन्य त्यांच्या जुन्या ठिकाणी परतेल. या टप्प्यात भारतीय सैन्य धानसिंह थापा प्रशासकीय चौकीजवळ परत येईल, तर चिनी सैन्य फिंगर-8 च्या मागे जाण्यास मान्य झाले आहे.









