सेन्सेक्स 519 अंकांनी वधारला : एल ऍण्ड टी सर्वाधिक तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी आणि शेअर बाजारातील सलग चौथ्या सत्रात मंगळवारी सेन्सेक्स 519.11 अंकांनी तेजीत राहिला आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमेवर मागील काही दिवसांपासून तणाव सुरु आहे. हा तणाव सध्या निवळत असल्याने याचे परिणाम सकारात्मक बाजारावर दिसले आहेत.
मागील आठवडय़ात भारताचे 20 जवान चीन सीमेवर शहीद झाले आहेत तर यामध्ये चीनच्या 40 हून अधिक सैनिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. याचा परिणाम काही दिवस शेअरबाजारात दिसला. मंगळवारी दोन्ही देशातील सैन्याच्या मुख्य अधिकाऱयांची सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी बैठक झाली आहे. या चर्चेतून तणाव कमी करण्यासंदर्भात सकारात्मक बोलणी झाल्याचे अहवालामधून सांगितले आहे. दिवसअखेर मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स 519.11 अंकानी वधारुन निर्देशांक 35,430.43 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 159.80 अंकांनी वधारुन निर्देशांक 10,471 वर बंद झाला.
प्रमुख कंपन्यांमध्ये लार्सन ऍण्ड टुब्रो कंपनीचे समभाग सर्वाधिक 7 टक्क्मयांनी वधारले आहेत तर अन्य कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, एनटीपीसी, पॉवरग्रिड कॉर्प, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि ऍक्सिस बँक यांच्या समभागातही तेजीचे वातावरण राहिले आहे. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि मारुती सुझुकीचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
जागतिक बाजाराचा कल सकारात्मक राहिला आहे कारण विदेशातील संस्थांकडून गुंतवणुकीचा प्रवाह सुरु राहिल्याने शेअर बाजारात मजबूत स्थिती राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. तरी येत्या काही दिवसांमध्ये ही सकारात्मक स्थिती कायम राहिल्यास गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण होऊन याचा लाभ शेअर बाजारांना होणार असल्याचे संकेत अभ्यासकांकडून सध्या व्यक्त करण्यात येत आहेत. बुधवारीही बाजारात सकारात्मक कल दिसेल असे संकेत आहेत.








