ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत-चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
आज सकाळी 11.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती भवनात जाऊन कोविंद यांची भेट घेतली. भारत-चीन सीमेवरील वाढता तणाव, पाकिस्तानकडून वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन तसेच कोरोनाची वाढती रूग्णसंख्या यासारख्या देशासमोरच्या महत्त्वपूर्ण आव्हानांवर ही चर्चा झाल्याचे समजते.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. पूर्व लडाखमधील सीमारेषेवरील वाद तसेच गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षामुळे भारत-चीनमधील संबंध अत्यंत नाजून वळणावर आहेत. आपल्याला एकाच वेळी अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचा सामना आपण करत आहोत. या काळात आपण एकजुटीने राहण्याची गरज आहे, असे नायडू यांनी म्हटले आहे.









