मनोज पवार/ दापोली
जगभरातील कोरोनाचे संकट व भारत-चीन संघर्षाचा मोठा फटका कोकणातील मासेमारीला बसला आहे. भारत व चीन तणावामुळे दोन्ही देशातील वाहतूक बंद असून चिनी बाजारपेठेत जाणारी मासळी बंद झाली आहे. त्यातच श्रावण महिन्यामुळे स्थानिक बाजारातही माशांना उठाव नसल्याने बहुतांश मच्छीमारांचा 1 ऑगस्टचा मुहूर्त हुकला आहे.
समुद्री मासेमारीवर असलेले शासकीय निर्बंध 31 जुलैच्या रात्री संपुष्टात आले आहेत. त्यामुळे 1 ऑगस्टपासून मासेमारीला मुभा मिळाली आहे. मात्र विविध संकटांचा सामना करणाऱया कोकणातील बहुसंख्य मासेमारांनी पहिल्या दिवशी आपल्या नौका समुद्रात लोटलेल्या नाहीत. कोकणातील समुद्रात मोठय़ा प्रमाणात मिळणारा राणी मासा, बोंबील, बगे व इतर छोटय़ा मासळीला चीनच्या मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. येथील दलाल हे मासे लिलावात खरेदी करून ते मुंबई येथील प्रक्रिया केंद्रात पाठवतात. तेथे ते हवाबंद करून चीनी बाजारपेठेत पाठवले जातात. तर मोठय़ा माशांना आशिया व युरोपीय देशांमध्ये मागणी असते. मात्र सध्या जगावर कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने व चीन व भारत यांच्यात कमालीचे तणावाचे वातावरण असल्याने या निर्यातीला ‘ब्रेक’ लागला आहे.
संकटांची मालिका
या बाबत सुवर्णदुर्ग फिशिंग संस्थेचे अध्यक्ष व दापोली पंचायत समिती सभापती रऊफ हजवानी यांनी ’तरुण भारत’ला अधिक माहिती देताना सांगितले की, केवळ हर्णे बंदरात दीड हजारपेक्षा अधिक नौका मासेमारी करतात. प्रत्येक नौकेवर 7 ते 8 खलाशी असतात. यामुळे केवळ हर्णे बंदर उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, डहाणू येथील सुमारे 10 ते 12 हजार खलाशांना रोजगार पुरवते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या गावी परतलेले खलाशी अद्याप दापोलीत आलेले नाहीत. इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना डिझेल परतावाही मिळालेला नाही. यामुळे येथील मच्छीमार मोठय़ा संकटात सापडला आहे. त्यात भरीस भर म्हणून मुंबई येथील भाऊचा धक्का येथील मासेमारी संघटनांनी 1 सप्टेंबरपर्यंत मासेमारी हंगाम सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे.
निर्यात नाही, जिल्हय़ातही उठाव नाही
चीनच्या बाजारपेठेत कोकणात मिळणाऱया माशांना मोठी मागणी असते. मात्र दोन्ही देशातील तणावामुळे सध्या हे मार्केटही गमवावे लागले आहे. मुंबईतील घाऊक मासे खरेदीदारांनाही कोकणातून येणारे मासे खरेदी करू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय सध्या श्रावण महिना सुरू असल्याने स्थानिक बाजारपेठेतही माशांना उठाव नाही. यामुळे नौकामालक जोखीम पत्करायला तयार नसल्याने 1 ऑगस्टचा मासेमारीचा मुहूर्त हुकल्याची माहितीही हजवानी यांनी दिली.
‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा
कोकणातील कोळी बांधवांना गेल्या मासेमारी हंगामात दोन वादळांचा सामना करावा लागला. मार्च महिन्यापासून लॉकडाऊनला सुरुवात झाल्याने मासेमारी हंगाम शासनाकडून अधिकृत बंदी घेण्याआधीच संपुष्टात आला. या अनेक संकटांचा सामना सुरू असताना भारत व चीन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने याचा थेट फटका येथील कोळी बांधवांना बसला आहे. कोरोना, निर्यात बंदी, नैसर्गिक संकटे या सर्व समस्यांमधून सुटका होऊन यंदा तरी मच्छीमारीला ‘अच्छे दिन’ यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पुरक व्यवसायही संकटात मासेमारीला सुरुवात झाल्यानंतर कोकणातील बाजारपेठेला थोडी आर्थिक उभारी येते. मात्र तो सध्या पूर्णपणे ठप्प असल्याने मासेमारीवर अवलंबून असणारे इतर व्यवसायांवरही आर्थिक संकट घोंगावत आहे. यात बैलगाडय़ा, टेम्पो, रिक्षा, ट्रक वाहतूकदार, बर्फ कारखाने, बर्फ वाहतूकदार, समुद्रकिनारी नौका बांधणी, नौका दुरुस्ती व नौकांची इंजिन दुरुस्ती करण्याचे व्यवसाय आणि किनारपट्टीवरील सर्व व्यवसायांवर मासेमारी ठप्प झाल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे. यामुळे हे संकट लवकरात-लवकर दूर व्हावे, अशी अपेक्षा हर्णे व्यापारी संघटनेचे सचिव सुनील आंबुर्ले यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली.









