आठव्या टप्प्यातील कोअर कमांडर स्तरीय चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि चीनदरम्यान कोअर कमांडर स्तरीय आठव्या टप्प्यातील चर्चा 6 नोव्हेंबर रोजी होऊ शकते. यापूर्वी सातव्या टप्प्यातील सैन्यस्तरीय चर्चा 12 ऑक्टोबर रोजी पार पडली होती. दोन्ही देशांदरम्यान मे महिन्यापासून तणाव कायम आहे.
आठव्या टप्प्यातील सैन्यस्तरीय चर्चेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व लेफ्टनंटर जनरल पीजी के मेनन करणार आहेत. मागील टप्प्यातील चर्चेनंतर दोन्ही देशांच्या सैन्यांकडून संयुक्त निवेदन प्रसारित करण्यात आले आहे. दोन्ही देश सैन्य तसेच राजनयिक माध्यमातून संवाद कायम ठेवण्यावर सहमत झाले आहेत. तणाव संपुष्टात आणण्यासाठी लवकरात लवकर संयुक्त तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे यात नमूद होते.
चीनकडून पुष्टी
चीनने भारतासोबत आठव्या सैन्यस्तरीय चर्चेची पुष्टी दिली आहे. दोन्ही देश परस्परांच्या सुविधेच्या दृष्टीकोनातून याच्या तारखांना अंतिम स्वरुप देणार आहेत.
चीनची चिंता वाढली
भारत आणि अमेरिकेसह जगातील 4 प्रमुख लोकशाहीवादी देश हिंदी महासागरात सागरी युद्धाभ्यास करत आहेत. बंगालच्या उपसागरात मंगळवारपासून भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या नौसैनिकांनी युद्धाभ्यास सुरू केल्याने चीनच्या चिंता वाढल्या आहेत.
4 दिवसांपर्यंत चालणाऱया मालाबार युद्धाभ्यासाच्या पहिल्या दिवशी क्वाडच्या सदस्य देशांच्या नौदलांनी परस्पर सैन्यसहकार्याची झलक दाखविली आहे. चीनसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या युद्धाभ्यासाचे विशेष महत्त्व आहे.









