ऑनलाईन टीम / मॉस्को :
भारत-चीनमध्ये सीमावादावरून निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. रशियातील मॉस्कोमध्ये परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट झाली. त्या भेटीत दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी पंचसूत्री फॉर्म्युला ठरला.
एस जयशंकर आणि वांग यी यांच्यात गुरुवारी दोन तास चर्चा झाली. त्यामध्ये दोन्ही देशातील तणाव कमी करणे, दोन्ही देशांनी सीमेवरील सैन्य संख्या कमी करणे, तसेच दोन्ही देशांमध्ये संवाद आणि द्विपक्षीय संबंध कायम रहावेत यादृष्टीने पाऊले उचलण्यावर एकमत झाले.
दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी पंचसूत्री ठरवण्यात आली. त्यामध्ये १. भारत आणि चीनमधील तणाव वाढेल, असे पाऊल दोन्ही देश उचलणार नाहीत. २. आपापसातील मतभेदांचे वादात रूपांतर होणार नाही, याची दोन्ही देश काळजी घेतील. ३. दोन्ही देश प्रोटोकॉल्सचे पालन करतील. ४. वादग्रस्त सीमाभागातून दोन्ही देश सैन्य मागे घेईल. ५. निश्चित नियमानुसार दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरू राहील.









