पंधरावी फेरी; दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचे प्रयत्न
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत आणि चीन यांच्यातील वरिष्ठ लष्करी कमांडर स्तरावरील चर्चेची पंधरावी फेरी भारताच्या चुशुल-मोल्डो मीटिंग पॉईंटवर शुक्रवारी पार पडली. सकाळी 10 वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळपर्यंत सुरू होती. या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची माहिती तातडीने देण्यात आलेली नाही. तथापि, दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
जून 2020 मध्ये गलवान खोऱयात दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये चकमक झाली होती, त्यानंतर तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी सतत भेटत आहेत. दरम्यान, भारतासोबतच्या पंधराव्या फेरीच्या चर्चेदरम्यान दोन्ही देश सीमा मुद्यावर आणखी एक पाऊल पुढे टाकू शकतील, अशी आशा चीनने व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमधील वादांवर न्याय्य तोडगा काढता येईल आणि दोन्ही बाजूंना मान्य असलेल्या तोडग्यावर पोहोचता येईल, असे मत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी व्यक्त केले आहे.









