पेट्रोलिंगदरम्यान वादावादी, अरुणाचल प्रदेशातील घटना
इटानगर / वृत्तसंस्था
अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात भारत आणि चीनचे सैन्य पुन्हा एकदा आमने-सामने आल्याची घटना घडली आहे. एकीकडे लडाखमधील संघर्षाची परिस्थिती कायम असतानाच चिनी सैन्याने अरुणाचलमध्येही कारनामे सुरू केल्याने सुरक्षा दल सतर्क झाले आहे. भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेशच्या तवांग भागामध्ये भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱया चीनी सैनिकांना अटकाव केला. चिनी लष्करातील 200 सैनिकांनी तिबेटच्या सीमेजवळून भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करत सैनिक तैनात नसणाऱया बंकर्सची नासधूस केल्याची माहिती सुरक्षा सूत्रांनी दिली. लष्कराकडून या घटनाक्रमासंदर्भात कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. पण संरक्षणासंदर्भातील जबाबदारी असणाऱया सुरक्षा दलांच्या अधिकाऱयांनी यामध्ये भारतीय संरक्षण दलांना नुकसान झाले नसल्याचे म्हटले आहे.
चिनी सैन्याच्या घुसखोरीचा हा प्रकार मागील आठवडय़ामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या बूम ला आणि यांगत्से प्रदेशामध्ये घडल्याची माहिती समोर येत आहे. चिनी लष्कराच्या गस्त घालणाऱया पथकाने भारतीय सीमेमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतानेही त्यांना चोख उत्तर देत चिनी तुकडीमधील काही सैनिकांना तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतले. हे प्रकरण नंतर स्थानिक लष्करी कमांडर्स स्तरावर सोडवण्यात आले. या प्रकारादरम्यान शाब्दिक संघर्ष झाला असला तरी चीनच्या सैनिकांना काही वेळाने सोडून देण्यात आले, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. चीनने या प्रदेशामध्ये अशाप्रकारे घुसखोरी करणे काही नवीन नाही. 2016 साली 200 हून अधिक चिनी सैनिक भारतीय सीमेमध्ये घुसले होते. पण काही तासांनंतर ते परत आपल्या प्रदेशात गेल्याचे यापूर्वीही निदर्शनास आले आहे.
प्रोटोकॉलच्या आधारावर चर्चेद्वारे तोडगा
भारत आणि चीनमधील सीमांची ठोस निश्चिती करण्यात आलेली नाही. दोन्ही देशांकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भात वेगवेगळे दावे केले जातात. दोन्ही देशांमधील समझोते आणि इतर करारांनुसार याठिकाणी शांतता ठेवण्याला प्राधान्य असले तरी घुसखोरीबद्दल दोन्ही देशांमध्ये सीमानिश्चिती नसल्यामुळे मतमतांतरे आहेत. सध्या दोन्ही बाजूच्या सैन्यांकडून या भागात गस्त घातली जाते. जेव्हा दोन्ही बाजूच्या गस्त घालणाऱया तुकडय़ा प्रत्यक्षात भेटतात, तेव्हा ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे ते वागतात. प्रोटोकॉलच्या आधारावर चर्चेद्वारे हा संघर्ष सोडवला जातो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
हॉट स्पिंगवर अजूनही वाद कायम
भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखच्या सीमेवर एक वर्षाहून अधिक काळ तणाव जैसे थेच आहे. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंनी चर्चेच्या अनेक फेऱया झाल्या आहेत. भारत आणि चीन यांच्यात नुकतीच 12 वी बैठकही झाली. पण हॉट स्पिंगवर अजूनही तोडगा निघालेला नाही.









