ऑनलाईन टीम / लडाख :
पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये शनिवारी सलग आठव्या दिवशी लष्करी स्तरावर बैठक झाली. सीमारेषेवर दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आहे, हे सैन्य मागे घेण्यावर चार तास चाललेली ही बैठक पुन्हा निष्फळ ठरली.
दोन दिवसांपूर्वी रशियातील मॉस्कोमध्ये परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट झाली. त्या भेटीत दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी पंचसूत्री फॉर्म्युला ठरला. त्यामध्ये दोन्ही देशातील तणाव कमी करणे, दोन्ही देशांनी सीमेवरील सैन्य संख्या कमी करणे, तसेच दोन्ही देशांमध्ये संवाद आणि द्विपक्षीय संबंध कायम रहावेत यादृष्टीने पाऊले उचलण्यावर एकमत झाले. मात्र, तरी देखील चीनने अडमुठेपणा कायम ठेवला आहे.
चीनने पूर्व लडाखमधील पेंगाँगच्या दक्षिण भागातील स्पंगूर गॅपमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य, शस्त्रसाठा आणि तोफा तैनात केल्या आहेत. त्यामुळे भारतानेही या भागात सैन्य, तोफा आणि रणगाडे तैनात केले आहेत. सीमारेषेवर दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने असल्याने तणाव कायम आहे.