फलंदाजी लाईनअप निश्चित करण्यासाठी विराटसेनेकडे आणखी एक संधी
दुबई / वृत्तसंस्था
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेला प्रत्यक्ष प्रारंभ होण्यापूर्वी भारताचा आज (बुधवार दि. 20) दुसरा व शेवटचा सराव सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असून या लढतीतील कामगिरीच्या माध्यमातून भारतीय संघ आपला फलंदाजी क्रम निश्चित करेल, हे स्पष्ट आहे. कर्णधार या नात्याने विराट कोहलीसाठी व मुख्य प्रशिक्षक या नात्याने रवी शास्त्री यांच्यासाठी ही शेवटची आयसीसी स्पर्धा असेल. आजची लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.
यापूर्वी विराट कोहलीने जाहीर केल्याप्रमाणे भारताचे आघाडीचे 3 खेळाडू निश्चित आहेत. केएल राहुल, रोहित शर्मा सलामीला फलंदाजीला उतरतील तर कर्णधार विराट कोहली तिसऱया स्थानी येणार आहे. दुसरीकडे, युवा धडाकेबाज फलंदाज इशान किशनने इंग्लंडविरुद्ध पहिल्या सराव सामन्यात 70 धावांची आतषबाजी करत अंतिम एकादशमध्ये प्रबळ दावेदारी सांगितली आहे.
सोमवारी रिषभ पंतला (नाबाद 29) सुर्यकुमार यादवच्या जागी बढतीवर पाठवण्यात आले. त्यामुळे, आजच्या लढतीत फलंदाजी क्रमात काही प्रयोग केले जाणार का, हे त्याचवेळी स्पष्ट होऊ शकेल. यापूर्वी, पहिल्या सराव सामन्यात रोहित खेळला नव्हता. मात्र, येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो ताज्या दमाने मैदानात उतरेल, अशी अपेक्षा आहे.
इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यात गोलंदाजीच्या आघाडीवर जसप्रित बुमराहने बिनचूक टप्प्यावर मारा केला. त्या तुलनेत भुवनेश्वर कुमार मात्र बराच महागडा ठरला होता.
मोहम्मद शमीने मागील लढतीत 3 बळी घेतले. पण, स्वैर मारा केल्याने त्याने धावाही बऱयाच दिल्या. अगदी फिरकीपटू राहुल चहरचा देखील इंग्लिश फलंदाजांनी उत्तम समाचार घेतला होता. आता आजच्या लढतीत रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर व गूढ फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांच्यावर अधिक भर दिला जाईल, असे संकेत आहेत. 2016 टी-20 वर्ल्डकपनंतर भारताने 72 टी-20 सामने खेळले असून त्यातील 45 सामन्यात विजय संपादन केले आहेत.
ऑस्ट्रेलियाचीही विजयी सलामी
पात्रता फेरीत ऑस्ट्रेलियाने देखील सोमवारी न्यूझीलंडला 3 गडी राखून पराभूत केले असून तोच फॉर्म भारताविरुद्ध कायम राखण्याचा त्यांचा मानस असणार आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सराव सामन्यात विजय संपादन केला असला तरी त्यांची कामगिरी संमिश्र स्वरुपाची ठरली. एकीकडे, डेव्हिड वॉर्नरचा खराब फॉर्म तो पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने कायम असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, दुसरीकडे, ऍडम झाम्पा (2-17), केन रिचर्डसन (3-24) यांनी गोलंदाजीत उत्तम कामगिरी साकारली.
फलंदाजीत ऑस्ट्रेलियाची मधली फळी गडगडली होती. मात्र, तळाच्या क्रमवारीत ऍस्टॉन ऍगर (18 चेंडूत 23), मिशेल स्टार्क (9 चेंडूत 13) व इंग्लिस (2 चेंडूत नाबाद 8) यांनी विजयावर शिक्कामोर्तब करुन देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. टी-20 च्या छोटय़ा क्रिकेट प्रकारात ऑस्ट्रेलियन संघ कधीच हय़ूज फोर्स म्हणून ओळखला गेलेला नाही. मात्र, आयसीसीच्या या सर्वोच्च व्यासपीठावर यंदा तरी ते लक्षवेधी खेळ साकारु शकणार का, हे येथे स्पष्ट होणार आहे.
संभाव्य संघ
भारत ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर.
ऑस्ट्रेलिया ः ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍस्टॉन ऍगर, पॅट कमिन्स (उपकर्णधार), जोश हॅझलवूड, जोश इंग्लिस, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, मिशेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झाम्पा.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
हार्दिक पंडय़ाबद्दल चिंता-अनिश्चितता कायम
इंग्लंडविरुद्ध लढतीत सातत्याने झगडत असलेल्या हार्दिक पंडय़ाबद्दल मात्र अद्याप चिंतेचे कारण कायम आहे. पंडय़ा गोलंदाजी करत नसल्याने त्याला फक्त फलंदाज या नात्याने खेळवले जाणार का, हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. पंडय़ा स्वतः गोलंदाजी करत नसल्याने भारताकडे आवश्यकता भासल्यास सहावा गोलंदाजी ऑप्शन नाही, ही संघव्यवस्थापनाची मुख्य चिंता आहे.









