नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
वर्षभरापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियातील पहिल्यावहिल्या कसोटी मालिकाविजयाचा 71 वर्षांपासून चालत आलेला दुष्काळ संपुष्टात आणला. खऱया अर्थाने भारतीय संघाने त्यावेळी इतिहास रचला. मात्र, त्या संघात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नरचा समावेश नव्हता. तोच धागा पकडत स्टीव्ह वॉने या मालिकेत स्मिथ, वॉर्नर असल्याने विराटच्या नेतृत्वाखालील भारताविरुद्ध उत्तम जुगलबंदी रंगेल, अशी अपेक्षा नोंदवली. उभय संघात 3 वनडे होणार असून त्याच्या समालोचनासाठी स्टीव्ह वॉ भारतात दाखल झाला आहे.
‘भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला परंपरा आहे. दोन्ही संघ आमनेसामने भिडतात, त्यावेळी अव्वल दर्जाचे क्रिकेट साकारले जाते, हा आजवरचा अनुभव आहे. ही मालिका देखील त्या परंपरेला अपवाद असण्याचे कारण नाही. दोन्ही संघ वर्चस्व गाजवण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतील आणि स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर समाविष्ट असल्याने आमचा संघ अर्थातच मजबूत झाला आहे’, असे स्टीव्ह वॉ पुढे म्हणाला.
‘भारताचा संघ जागतिक स्तरावर सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. आव्हाने स्वीकारत यश खेचून आणणे त्यांना विशेष पसंत असते. त्यामुळे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी ते ही महत्त्वाकांक्षी असतील. ही मालिका चाहत्यांसाठी प्रदीर्घ काळ स्मरणात राहणारी ठरेल’, असे स्टीव्ह वॉने येथे नमूद केले. येत्या ऑस्ट्रेलियन हंगामात भारतीय संघ दिवस-रात्र कसोटी खेळेल, असा आशावाद त्याने याप्रसंगी व्यक्त केला.
‘ऑस्ट्रेलियन भूमीत दिवस-रात्र कसोटी खेळणे कोणत्याही संघासाठी आव्हानात्मक असते आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंना ते विशेष आवडेल. जर भारत जागतिक स्तरावरील सर्वोत्तम संघ असेल तर सर्व प्रतिस्पर्ध्यांविरोधात सर्व प्रकारच्या वातावरणात स्वतःला त्यांनी सिद्ध करावे. या निकषावर त्यांनी ऑस्ट्रेलियात दिवस-रात्र कसोटी खेळावी आणि तेथे विजय संपादन करुन दाखवावे’, असे आव्हानही त्याने शेवटी दिले.
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिका
तारीख / सामना / वेळ / ठिकाण
14 जानेवारी / पहिली वनडे / दु. 1.30 पासून / मुंबई
17 जानेवारी / दुसरी वनडे / दु. 1.30 पासून / राजकोट
19 जानेवारी / तिसरी वनडे / दु. 1.30 पासून / बेंगळूर
ऍडम कॅरे म्हणतो, माझ्यासमोर धोनीचा आदर्श!
मुंबई : भारतीय संघातर्फे महेंद्रसिंग धोनीने यष्टीरक्षणात जो आदर्श निर्माण केला, त्याचीच पुनरावृत्ती मला आमच्या संघातर्फे करायची आहे, असे ऑस्ट्रेलियाचा विद्यमान यष्टीरक्षक ऍडम कॅरे म्हणाला. जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी यांच्यासारख्या कसलेल्या, जागतिक दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध येथे कसोटी लागू शकते, असेही तो म्हणाला.
‘अद्याप मला माझ्या खेळात बऱयाच सुधारणा करायच्या आहेत. फलंदाजीत मी मध्यफळीपासून तळाच्या फळीपर्यंत कोणत्याही स्थानी फलंदाजीला उतरु शकतो. सामने जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलून देण्यात अद्याप मेहनत घ्यावी लागेल आणि हे सर्व धोनीने भारतासाठी प्रदीर्घ काळ केले आहे’, असे कॅरे येथे म्हणाला. सलग यष्टीरक्षण करणे आणि त्यानंतर मध्यफळीत फलंदाजीत लक्षवेधी योगदान देणे, अशा दुहेरी जबाबदाऱयांमुळे ही मालिका देखील माझ्यासाठी आव्हानात्मक असेल, असे कॅरेने नमूद केले. 2019 विश्वचषक स्पर्धेत कॅरे ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.









