वृत्तसंस्था/ मेलबोर्न
भारतीय क्रिकेट संघ येत्या नोव्हेंबर- डिसेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. या मालिकेत उभय संघांत चार सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. भारताच्या या कसोटी मालिकेला ऍडलेड किंवा ब्रिस्बेन येथे प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या मालिकेचा प्रारंभ पर्थमध्ये करण्याचे ठरले होते. पण क्वॉरंटाईनच्या नियमामध्ये कोणतीही शिथिलता नसल्याने या मालिकेचा प्रारंभ पर्थ येथे केला जाणार नसल्याचे पश्चिम ऑस्ट्रेलिया शासनाच्या प्रवक्त्याने सांगितले. ऍडलेड ओव्हलच्या मैदानावर आता या मालिकेतील पाठोपाठ दोन कसोटी सामने खेळविले जाणार आहेत. यामध्ये दिवस-रात्रीच्या तसेच बॉक्सिंग डे कसोटी सामन्यांचा समावेश आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये सध्या सुरू असलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर भारतीय आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अरब अमिरातमधून थेट ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत.









