पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्गार ः द्विपक्षीय संबंधांना 30 वर्षे पूर्ण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत-इस्रायल संबंधांना 30 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी महत्त्वाचा संदेश दिला आहे. आजचा (शनिवार) दिवस आमच्या संबंधांमध्ये एक विशेष महत्त्व बाळगून आहे. 30 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी दोन्ही देशांदरम्यान राजनयिक संबंध पूर्ण स्वरुपात प्रस्थापित झाले होते. दोन्ही देशांदरम्यान एक नव्या अध्यायाची सुरुवात झाली होती. हा अध्याय नवा होता, परंतु आमच्या देशांचा इतिहास खूप जुना आहे. पूर्ण जग महत्त्वपूर्ण बदल पाहत असताना भारत-इस्रायल संबंधांचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आगामी दशकांमध्ये भारत-इस्रायलची मैत्री परस्पर सहकार्यात नव्या मैलाचा दगड गाठणार असा पूर्ण विश्वास असल्याचे मोदी म्हणाले.
दोन्ही देशांच्या लोकांदरम्यान शतकांपासून घनिष्ठ नाते राहिले आहे. शेकडो वर्षांपासून आमचा ज्यू समुदाय भारतीय समाजात कुठल्याही भेदभावाशिवाय एका सौहार्दपूर्ण वातावरणात राहिला आहे. या समुदायाने आमच्या विकास यात्रेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. भारत आणि इसायल मधील सहकार्याने दोन्ही देशांच्या विकासगाथेत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मोदी म्हणाले.
तत्पूर्वी शुक्रवारी भारत आणि इस्रायलच्या विदेश मंत्र्यांनी इस्रायलमधील वृत्तपत्र ‘ऑप-एड’मध्ये एक लेख लिहून दोन्ही देशांमधील संबंधांचे महत्त्व नमूद केले आहे. दोन्ही देशांनी मागील 3 दशकांपासून संबंध दृढ करत सुरक्षा क्षेत्रासह सर्वसाधारण आव्हानांवर तोडगा काढण्याच्या दिशेने सोबत मिळून काम केले असल्याचे विदेशमंत्री एस. जयशंकर आणि इस्रायलचे विदेशमंत्री यायर लॅपिड यांनी म्हटले आहे.
भारताने 17 सप्टेंबर 1950 रोजी इस्रायलला एक देश म्हणून मान्यता दिली होती. परंतु देशांदरम्यान पूर्ण राजनयिक संबंध 29 जानेवारी 1992 रोजी प्रस्थापित झाले होते. 30 वर्षांपूर्वी द्विपक्षीय संबंध प्रस्थापित झाले तेव्हा दोन्ही देशांमध्ये उत्सुकता हाहेती. भारत आणि इस्रायल हे दोन प्राचीन संस्कृती असणारे देश आहेत. दोन्ही देश नवोन्मेषाबद्दल खुला दृष्टीकोन बाळगणार आहेत. दोन्ही देश अन्य संस्कृतींसोबत संवाद साधण्याच्या क्षमतेने प्रेरित असल्याचे लेखात नमूद करण्यात आले होते.









