ज्युनियर फीजिओ योगेश परमार कोरोना पॉझिटिव्ह ठरल्यानंतरही अनिश्चिततेचे मळभ दूर, सर्व भारतीय क्रिकेटपटूंचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा
वृत्तसंस्था /मँचेस्टर
भारतीय संघाचा ज्युनियर फीजिओ योगेश परमारला कोरोनाचा संसर्ग झाल्याने भारत-इंग्लंड संघात आजपासून (शुक्रवार दि. 10) खेळवल्या जाणाऱया पाचव्या व शेवटच्या कसोटी सामन्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. मात्र, सर्व भारतीय खेळाडूंचे निगेटिव्ह रिपोर्ट आल्याने दिलासा लाभला असून सामना पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे होण्याची शक्यता बळावली. सामना होऊ शकल्यास भारतीय संघ या मालिकेत तूर्तास 2-1 फरकाने आघाडीवर आहे. पहिल्या दिवसाच्या खेळाला पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, दुपारी 3.30 वाजता सुरुवात होईल.
या सामन्यावर पावसाचे सावट असून लढत होऊ शकली नाही तर ही बाब भारताच्या पथ्यावरच पडेल आणि मालिकाविजयावर देखील शिक्कामोर्तब होऊ शकणार आहे. असे झाल्यास विराट कोहली विदेशात ऑस्ट्रेलिया (2018-19) व इंग्लंड (2021) यांच्याविरुद्ध मालिका विजय प्राप्त करवून देणारा पहिला भारतीय कर्णधार ठरेल.
लढत होऊ शकल्यास अंतिम 11 सदस्यीय लाईनअप कशी असेल, याबद्दलही औत्सुक्य असणार आहे. मागील महिन्याभरात तब्बल 151 षटके गोलंदाजी करणाऱया बुमराहवरील वर्कलोडबाबत यावेळी प्रामुख्याने विचार होऊ शकतो. एकीकडे, ओव्हलवरील चौथी कसोटी 157 धावांनी जिंकून देण्यात बुमराहने मोलाचा वाटा उचलला असल्याने त्याची उपलब्धता महत्त्वाची असणार आहे. शिवाय, दुसरीकडे, त्याच्यावर अतिरिक्त भार असू नये, याबद्दल विचार होणे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे.
याचप्रमाणे, खराब फॉर्ममधील अजिंक्य रहाणे सातत्याने अपयशी ठरत असल्याने त्याला या लढतीतून डच्चू द्यायचा की कारकीर्द वाचवण्यासाठी आणखी एक संधी द्यायची, याबद्दल काय निर्णय घेतला जाईल, ते पाहणे महत्त्वाचे असेल. रहाणे मागील 7 पैकी 6 डावात अपयशी ठरला असून संघव्यवस्थापनासाठी अर्थातच ही चिंतेची बाब ठरत आली
आहे.
बुमराहबाबत उत्सुकता
यापूर्वी, बुमराहने ओव्हलवर आपल्या भेदक स्पेलमध्ये ऑलि पोप व जॉनी बेअरस्टो यांच्या रिव्हर्स स्विंगवर त्रिफळा उडवला होता, ते पाहता त्याला विश्रांती देण्याचा धोका व्यवस्थापन स्वीकारणार का, याबद्दल आताच काही ठामपणे सांगता येणार नाही. मात्र, खेळपट्टीचे स्वरुप पाहता त्यानुसार देखील काही बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे एकंदरीत चित्र आहे.
मोहम्मद शमी तंदुरुस्त झाला असून पाचव्या लढतीसाठी तो उपलब्ध आहे. मात्र, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या गैरहजेरीत विराटचा निर्णय महत्त्वाचा असेल. ओल्ड ट्रफोर्डची खेळपट्टी गोलंदाजीला पोषक असेल. पण, टी-20 विश्वचषक अवघ्या 6 आठवडय़ांच्या अंतरावर असल्याने कोणत्याही महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत होऊ नये, याची दक्षता घेणे देखील तितकेच आवश्यक असणार आहे. मागील सामन्यात अव्वल गोलंदाजी साकारणारे उमेश यादव (6 बळी), अष्टपैलू शार्दुल ठाकुर (117 धावात 3 बळी) येथे खेळतील. मात्र, सातत्याने खेळत आलेल्या बुमराहला विश्रांतीची नितांत गरज असणार आहे.
भारतीय संघाचे सराव सत्रही रद्द
भारतीय क्रिकेट संघाचे ज्युनियर फीजिओ योगेश परमार कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळून आल्यानंतर संघाचे सराव सत्र देखील रद्द केले गेले. परमार पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने भारतीय संघ फीजिओशिवाय असेल, हे स्पष्ट झाले. मुख्य फीजिओ नितीन पटेल यापूर्वीच आयसोलेट आहेत. बीसीसीआयने इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाकडे फीजिओ उपलब्ध करुन देण्याची विनंती केली असल्याचे वृत्त आहे. आरटी-पीसीआर चाचणी सुरु असल्याने सर्व खेळाडूंना आपल्या रुममध्येच थांबण्याची सूचना केली गेली होती.
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांना कोरोनाची लागण झाली असल्याने ते आयसोलेट आहेत. सध्या फक्त फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड हेच संघासमवेत आहेत. रवी शास्त्री व अन्य सहायक प्रशिक्षक कोहलीच्या संपर्कात असतील, असे सांगण्यात आले आहे.
इंग्लंडची सर्व भिस्त केवळ रुटवर
मालिकेत पिछाडीवर असलेल्या इंग्लंडला बरोबरी प्राप्त करण्यासाठी येथे कोणत्याही परिस्थितीत विजय संपादन करणे आवश्यक आहे. मात्र, ते या लढतीतही फक्त आणि फक्त रुटवरच अवलंबून असतील, हे देखील सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. रुटला ओव्हलवरील अपयशाची भरपाई करायची असून मालिकेत 600 धावांचा टप्पा सर करण्याचे लक्ष्यही त्याच्यासमोर असणार आहे.
उपकर्णधार जोस बटलर इंग्लिश संघात परतत असून तो बेअरस्टोची जागा घेऊ शकेल. मार्क वूड ख्रिस वोक्सच्या साथीने नवा चेंडू हाताळेल. जेम्स अँडरसन व क्रेग ओव्हर्टन येथे खेळणार नाहीत, असे सध्याचे संकेत आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रित बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकुर.
इंग्लंड : रोरी बर्न्स, हसीब हमीद, मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जो रुट, जोस बटलर, डॅन लॉरेन्स, ऑलि रॉबिन्सन, सॅम करण, मार्क वूड, जेम्स अँडरसन, जॅक लीच, ऑलि पोप, डेव्हिड मलान, क्रेग ओव्हर्टन.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 पासून.









