दोन वर्षांसाठी असणार कार्यकाळ : ऑगस्ट महिन्यात अध्यक्षपदाची जबाबदारी : सुधारणांचा अजेंडा
वृत्तसंस्था / संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघाची सर्वोच्च निर्णायक संस्था म्हणजेच सुरक्षा परिषदेचा भारत अस्थायी सदस्य झाला आहे. भारताचे सदस्यत्व दोन वर्षांसाठी असणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताची आठव्यांदा निवड झाली आहे. ऑगस्ट महिन्यात भारत परिषदेचा अध्यक्षही असेल. या कार्यकाळाचा वापर संयुक्त राष्ट्रसंघात सुधारणा घडवून आणण्यासाठी भारत करणार असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
सुरक्षा परिषदेच्या 5 कायमस्वरुपी सदस्यांपैकी चार देशांनी (अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स) यापूर्वीच भारताच्या निवडीचे स्वागत केले असून भारतासोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. भारतासह मेक्सिको, आयर्लंड आणि नॉर्वे यांचीही दोन वर्षांसाठी सदस्य म्हणून निवड झाली आहे.
दहशतवादाच्या विरोधात जागतिक आघाडीला बळकटी देण्यावर भारताचे प्राधान्य असेल, परंतु सद्यस्थिती पाहता भारत कोरोनाविरोधात जागतिक सहकार्यात अधिक सकारात्मक भूमिका बजावणार आहे. कोरोना लसीचा उत्पादक म्हणून भारताकडे पूर्ण जग पाहत असताना ही जबाबदारी अधिकच वाढणार आहे.
1950-51 मध्ये भारत सर्वप्रथम सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य झाला होता. त्यानंतर 1697-68, 1972-73, 1977-78, 1984-85, 1991-92 आणि 2011-12 मध्येही सदस्य म्हणून भारताची निवड झाली होती. स्वतःच्या प्रत्येक कार्यकाळात भारताने विकसनशील देशांच्या हितासाठी आणि जगातील विविध हिस्स्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम केले आहे. 2011-12 मधील सदस्यत्वावेळी पथकाचे नेतृत्व विद्यमान नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केले होते. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी पी.आर. त्रिमूर्ती यांना नव्या जबाबदारीसाठी पुरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सुधारणांसाठी काम करणार
भारत सुधारणांचा अपूर्ण अजेंडा मार्गी लावण्यासाठी काम करणार असल्याचे त्रिमूर्ती यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सुरक्षा परिषदेतील सुधारणांचा मुद्दा उपस्थित केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेला संबोधित करताना मोदींनी सुरक्षा परिषदेत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने भूमिका मांडली होती. सुरक्षा परिषदेच्या 5 सदस्यांपैकी केवळ चीन भारताच्या सदस्यत्वाला विरोध दर्शवित आहे.









