अमेरिकाच्या दौऱयावर असणारे जयशंकर यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / वाशिंग्टन
भारत आणि अमेरिका यांच्यात सुदृढ विपक्षीय संबंध असून कोरोनावर मात करण्यासाठी ही भागिदारी उपयुक्त ठरणार आहे. अमेरिकेच्या उद्योग क्षेत्राने भारताची आवश्यकता घेऊन कोरोनाच्या दुसऱया उद्रेकाच्या काळात भारताला जलदगतीने मोलाचे साहाय्य केले आहे, असे प्रतिपादन अमेरिकेच्या दौऱयावर असलेले भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे.
जयशंकर शुक्रवारी अमेरिकेत पोहचले. अमेरिकेत सत्तापालट झाल्यानंतर त्या देशाला भेट देणारे ते पहिलेच भारतीय परराष्ट्र मंत्री ठरले. भारतात व्यापक प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. लसी करण्यासाठी लागणारे काही पायाभूत घटक भारत अमेरिकेकडून मागविण्याच्या तयारीत आहे. त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी जयशंकर हे अमेरिकेत गेले आहेत.
भागिदारी गटाबरोबर बैठक
भारत अमेरिका धोरणात्मक भागिदारी गटाबरोबर (युएसआयएसपीएफ) जयशंकर यांनी शुक्रवारी चर्चा केली. चर्चेचा विषय प्रामुख्याने कोरोना हाच होता. लस निर्मिती, औषध निर्मिती, रुग्ण सेवा यासंदर्भात कशा प्रकारे सहकार्य करता येईल यासंबंधी त्यांनी चर्चा केल्याचे समजते. त्यापूर्वी जयशंकर यांनी युएस ग्लोबल टास्क फोर्सबरोबरही कोरोना सहकार्य आणि इतर बाबींवर चर्चा केली.









