दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये चर्चा- अनेक करारावर स्वाक्षऱया
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड जेम्स ऑस्टिन सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱयावर आहेत. शनिवारी त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी विज्ञान भवन येथे शिष्टमंडळ पातळीवरील चर्चा केली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये सुरक्षाविषकयक अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर सहमती दर्शविली गेली. यावेळी सीडीएस जनरल बिपिन रावत आणि तिन्ही दलांचे सेनाप्रमुख उपस्थित होते. या करारांमुळे संरक्षणविषयक द्विपक्षीय संबंधांनी नवी उंची गाठली आहे. भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध बळकट झाल्यामुळे चीनवर दबाव निर्माण होऊन तणाव वाढेल, असा दावा केला जात आहे.
शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर पत्रकार परिषदेत करार आणि चर्चेसंबंधीची माहिती देण्यात आली. दोन्ही देशांनी भारतीय सैन्य आणि अमेरिकन इंडो-पॅसिफिक कमांड, सेंट्रल कमांड, आफ्रिका कमांड यांच्यात सहकार्य वाढविण्यास सहमती दर्शविली आहे. त्यानुसार आम्ही लेमोआ (एलईएमओए), कोमकासा (सीओएमसीएएसए) आणि बेका (बीईसीए) करारांवर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेबरोबर मजबूत संरक्षण भागिदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे राजनाथ सिंग यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
संरक्षणमंत्री ऑस्टिन आणि त्यांच्या शिष्टमंडळाबरोबर आम्ही व्यापक आणि फलदायी संभाषण झाले. आम्ही सर्वंकष जागतिक रणनीतिक भागिदारीची क्षमता वाढवण्याचा निर्धार केला आहे. संरक्षण-सहकार्य, सैन्य सहमती, सैन्य वाढविणे, संरक्षण आणि परस्पर तार्किक समर्थनाच्या उदयोन्मुख क्षेत्रात माहिती सामायिकरण आणि सहकार्य यावरही विस्तृत चर्चा झाली, असे राजनाथ सिंग पुढे म्हणाले.
संबंध अधिक दृढ व्हावेत- ऑस्टिन
राजनाथ सिंग यांच्यानंतर अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनीही बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींच्या भूमिकेला अमेरिकेची सहमती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्याच्यादृष्टीने आजची चर्चा अतिशय महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले. ऑस्टिन संरक्षणमंत्री या नात्याने प्रथमच भारत दौऱयावर आले आहेत.
ऑस्टिन-मोदी भेट
अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांनी शुक्रवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि भरभराट होण्यासाठी अमेरिकेची भारतासमवेत अधिकाधिक काम करण्याची इच्छा असल्याचे ऑस्टिन यांनी मोदी यांच्याकडे स्पष्ट केले. मोदी यांनी यावेळी दोन्ही देशांमधील भागिदारीबाबतचा आपला दृष्टिकोन मांडला आणि भारत-अमेरिका संबंधांमध्ये संरक्षणविषयक परस्पर सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन यांच्यापर्यंत आपल्या शुभेच्छा पोहोचवाव्या, असे यावेळी मोदी यांनी ऑस्टिन यांना सांगितले. बायडेन यांनीही आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत, असे ऑस्टिन यांनी मोदी यांना सांगितले.









