वृत्तसंस्था / अबूधाबी
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वर्षांपासून असलेला दुरावा संपण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. दोन्ही देशांचे नेते आता शांतता चर्चेचा सूर काढत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोरोनाबाधित झाल्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. याचदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्रीचा हा मार्ग संयुक्त अरब अमिरातचे राजघराणे तयार करत असल्याचे बोलले जात आहे.
भारत आणि पाकिस्तानी सैन्याने अचानक शस्त्रसंधी प्रभावीपणे लागू केल्याने जगाला सुखद धक्का बसला होता. याच्या 24 तासांनी संयुक्त अरब अमिरातचे विदेश मंत्री एक दिवसाच्या भारत दौऱयावर आले होते. युएईकडून प्रसिद्ध वक्तव्यात पाकिस्तानसंबंधी चर्चेबद्दल संकेत देण्यात आला होता. विदेश मंत्री शेख अब्दुल्ला बिन जाएद यांनी भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्याशी परसपर हिताच्या सर्व क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांवर चर्चा केली असून विचारांचे आदान-प्रदान केल्याचे यात म्हटले गेले होते.
शस्त्रसंधी केवळ एक सुरुवात

भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीवरून झालेली सहमती गुपचूपपणे सुरू असलेल्या चर्चेतील मैलाचा दगड होती. ही चर्चा युएईच्या मध्यस्थीद्वारे होत आहे. दोन्ही शेजारी देशांदरम्यान शांततेच्या दिशेने शस्त्रसंधी केवळ एक सुरुवात आहे. दोन्ही देश अण्वस्त्रांनी सज्ज असून अनेकदा क्षेत्रीय वादावरून परस्परांसमोर उभे ठाकत असतात असे युएईच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे.
राजदूत नियुक्त होणार
दोन्ही देशांकडून परस्परांकडे स्वतःचे राजदूत परत पाठवण्याचा निर्णय या शांतता प्रक्रियेतील पुढील पाऊल ठरणार आहे. पाकिस्तानने 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावर स्वतःच्या राजदूताला माघारी बोलाविले होते. राजदूत परतल्यावर दोन्ही देशांदरम्यान वादाचे विषय असलेल्या मुद्दय़ांवर चर्चा होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
युएईसोबत ऐतिहासिक संबंध
युएईच्या भूमिकेसंबंधी पाकिस्तान तसेच भारताच्या विदेश मंत्रालयाने कुठलीच टिप्पणी केलेली नाही. युएईचे भारत आणि पाकिस्तानसोबत ऐतिहासिक, व्यापारी आणि राजनयिक संबंध राहिले आहेत. सध्या युएईचे शासनप्रमुख शेख मोहम्मद बिन जाएद अल नाहयान आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये आक्रमकपणे भूमिका पार पाडत आहेत. ते आशियात जागतिक राजनयिक आणि व्यापारी संबंध निर्माण करू पाहत आहेत.









