वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशांमध्ये खबरदारीचे उपाय म्हणून इतर देशांबरोबर संपर्क तोडले आहेत. याचा विपरित परिणाम जागतिक क्रीडा घडामोडीवर होत आहेत. आता भारतीय हॉकी संघांचा नियोजित युरोपियन दौरा अधांतरी झाला आहे. या दौऱयावर साशंकतेचे सावट पसरले आहे.
2020 टोकियो ऑलिंपिक क्रीडा ज्योत प्रज्वलन कार्यक्रम ग्रीसमध्ये प्रेक्षकविना पार पडला. अनेक क्रीडास्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला तर काही क्रीडास्पर्धा रद्द केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेतील काही सामने प्रेक्षकविना बंदीस्त स्टेडियममध्ये खेळविले जात आहेत. कोरोना व्हायरसची भारतीय शासनाने गंभीर दखल घेतली असून बेंगळूरच्या साई क्रेंद्रामध्ये सराव करत असलेल्या भारताच्या पुरूष आणि महिला हॉकी संघांचा आगामी युरोपियन दौरा अनिश्चित झाला आहे. हा दौरा रद्द होण्याची शक्यता असून या संदर्भात लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे. जपानमध्ये होणारी कनिष्ठांची आशिया चषक महिलांची हॉकी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय हॅकी फेडरेशनच्या प्रो लीग युरोप दौऱयासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने आपले संघ पाठविण्यास नकार दिला आहे. सध्या चीनच्या महिलाचे वास्तव्य दक्षिण आफ्रिकेत आहे.
विविध देशांमध्ये पासपोर्ट आणि व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे. हा निर्णय 15 एप्रिलपर्यंत अंमलात येणार असून त्यानंतर कोरोना व्हायरसच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. जपानमध्ये येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेवरही साशंकेतेचे सावट पसरले आहे.